अखेर किसान रेल्वेला मिळाला लासलगावी थांबा! जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमाल पाठविण्याची संधी  

अरुण खंगाळ
Tuesday, 15 September 2020

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्गास त्यांचा शेतमाल कमी वेळेत परराज्यात पाठविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या किसान रेल्वे गाडीला लासलगाव येथे थांबा मिळण्यासाठी बाजार समिती कार्यालयात कार्यक्षेत्रातील शेतकरी, व्यापारी व रेल्वेचे अधिकरी यांच्या समवेत जगताप यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या.

नाशिक / लासलगाव : देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला गुरुवार (ता. १७)पासून लासलगाव येथे थांबा मिळणार असल्याने शेतकरी व व्यापारी बांधवांनी आपला शेतमाल कमी वेळेत परराज्यात पाठविण्यासाठी किसान रेल्वेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी केले. 

किसान रेल्वेला लासलगावी थांबा 
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्गास त्यांचा शेतमाल कमी वेळेत परराज्यात पाठविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या किसान रेल्वे गाडीला लासलगाव येथे थांबा मिळण्यासाठी बाजार समिती कार्यालयात कार्यक्षेत्रातील शेतकरी, व्यापारी व रेल्वेचे अधिकरी यांच्या समवेत जगताप यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यांच्या मागणीनुसार खासदार डॉ. भारती पवार यांच्यामार्फत केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला लासलगाव येथे थांबा मिळावा यासाठी विनंती केली होती. 

गुरुवारपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतमाल पाठविण्याची संधी
त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने लासलगाव बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधव व व्यापारी वर्गाच्या हितासाठी देवळाली ते मुझफ्फरपूर या देशातील पहिल्या किसान रेल्वे पार्सल गाडीला गुरुवार (ता. १७)पासून लासलगाव येथे थांबा दिला आहे. त्याबद्दल लासलगाव बाजार समितीकडून सौ. जगताप यांनी गोयल व पवार यांचे आभार मानले. खासदार डॉ. पवार दिल्ली येथे अधिवेशनासाठी गेल्या असून, त्या दिल्लीहून गाडीला ऑनलाइन फ्लॅग दाखविणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. तसेच लासलगाव येथे गुरुवारी सायंकाळी ७.२२ ला थांबणाऱ्या पार्सल गाडीद्वारे परराज्यात आपला शेतमाल पाठविण्यासाठी शेतकरी व व्यापारी वर्गाने लासलगाव रेल्वेस्थानकाचे मुख्य पार्सल तथा बुकिंग पर्यवेक्षक व्ही. बी. जोशी यांच्याशी ९९२१२९२१९९/९५०३०११९८२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून शेतमाल पाठवावा, असे आवाहनही सभापती जगताप यांनी केले आहे. 

लासलगाव स्टेशनवरून कोठे पाठविता येईल शेतमाल (कंसात भाडे दर प्रतिक्विंटलचे) : 
जबलपूर (रु. २२०.९४), कटनी (रु. २४७.६५), सतना (रु. २६७.३५), माणिकपूर (रु. २९१.२६), मुगलसराय (रु. ३४५.८४), बक्सर (रु. ३६८.५६), दानापूर (रु. ३९०.२८), मुझफ्फरपूर (रु. ४०८.३९)  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kisan Railway got a stop at Lasalgaon nashik marathi news