शालेय वयातच चक्क 100 पदकांचा 'तो' ठरला मानकरी...

NSK20F57371_pr[1].jpg
NSK20F57371_pr[1].jpg

नाशिक : स्थानिक, राज्यस्तरीय अनेक स्पर्धांत पदकांची कमाई करणाऱ्या येथील कृष्णा राजेंद्र गडाखला आशियाई आणि ऑलिंपिक स्पर्धांचा ध्यास आहे. त्याची पहिली पायरी म्हणून त्याने गुवाहाटी (आसाम)मध्ये "खेलो इंडिया' उपक्रमात फ्रीस्टाइल पोहण्याच्या स्पर्धेत रौप्य आणि कांस्यपदकांची कमाई करून दहावीत शिकत असतानाच पोहण्याच्या स्पर्धांमध्ये पदकांची सेंच्युरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो नाशिकचा पहिला खेळाडू ठरला आहे.

कृष्णाने आजवर 40 सुवर्ण, 30 रौप्य, 30 कांस्य अशी तब्बल शंभर पदके पटकावली...

पंधरावर्षीय कृष्णाने शनिवारी (ता. 25) आठशे मीटर फ्रीस्टाइलमध्ये रौप्यपदक, तर चारशे मीटर फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक पटकावले. वयाच्या सहाव्या वर्षांपासून पोहण्याचा सराव करणाऱ्या कृष्णाने यापूर्वीही राष्ट्रीयस्तरावर घवघवीत यश मिळविले आहे. तो दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा विद्यार्थी आहे. कृष्णाने आजवर 40 सुवर्ण, 30 रौप्य, 30 कांस्य अशी तब्बल शंभर पदके पटकावलेली आहेत. 

2008 मध्ये सर्वप्रथम स्केटिंग व कराटेचे प्रशिक्षण...

लहानपणापासूनच पोहण्यामध्ये अग्रेसर असल्याने आजवर अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊन त्याने हे यश मिळविले. मालवणमध्ये झालेल्या स्पर्धेत त्याचा सर्वोत्तम जलतरणपटू म्हणून सन्मान झाला. त्याने 2008 मध्ये सर्वप्रथम स्केटिंग व कराटेचे प्रशिक्षण घेतले. मात्र काहीतरी नवीन विक्रम करायचा, या हेतूने 2009 मध्ये नाशिक रोडच्या राजमाता जलतरण तलावात पोहण्याच्या प्रशिक्षणास सुरवात केली. 
दिलीप मोरे, माया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने पोहण्याचे धडे घेतले.  त्यानंतर 2012 मध्ये नाशिकच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात "साई'चे प्रशिक्षक शंकर मादगुंडी, राजेंद्र निंबायते, हरी सोनकांबळे, ऍथलिटिकपटू सिद्धार्थ वाघ 
यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत विविध पदकांची कमाई केली.

खेलो इंडिया स्पर्धेत पदकाची कमाई करणारा तो नाशिकचा पहिला जलतरणपटू...

2015 मध्ये भोसला मिलिटरी स्कूलमधील स्वीमिंग क्‍लब येथे घनश्‍याम कोर व विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्ष सराव सुरू ठेवला होता. गेल्या वर्षी चार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्याने तीन सुवर्ण, तीन रौप्य व दोन कांस्यपदके पटकावली. राष्ट्रीय शालेय स्पर्धा, राष्ट्रीय वयोगट स्पर्धा, राष्ट्रीय ज्येष्ठ स्पर्धा, राष्ट्रीय सी. बी. सी. स्पर्धा यांमध्येही त्याने आपली छाप सोडली आहे. खेलो इंडिया स्पर्धेत पदकाची कमाई करणारा तो नाशिकचा पहिला जलतरणपटू ठरला आहे. 

आईचे असेही योगदान... 

कृष्णाच्या विविध स्पर्धांतील कामगिरीचा आढावा घेतल्यावर इंदूर (मध्य प्रदेश) येथील शिशुकुंज राष्ट्रीय अकॅडमीचे प्रशिक्षक अभिलाष तांबे आणि मनोज दवे यांनी त्याचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील सहभाग व त्या स्तराच्या सरावासाठी त्यांनी त्याच्या पालकांना मार्गदर्शन केले. त्यामुळे 2018 पासून कृष्णाच्या सरावासाठी त्याची आई मनीषा त्याच्यासोबत इंदूर येथे राहात आहेत. त्याचा आहार, सराव व अन्य मार्गदर्शनासाठी त्या सदैव त्याच्यासमवेत राहतात. येथील प्रशिक्षणातील सरावात त्याने अनेक राष्ट्रीय विक्रमांशी बरोबरी केली आहे. अशोका ऍटोचे संचालक राजेंद्र गडाख यांचा तो मुलगा आहे. भारताकडून आशियाई व ऑलिंपिक स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याचा त्याचा मानस आहे. 


ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याचे माझे ध्येय...

वयाच्या सहाव्या वर्षांपासूनच पोहायला सुरवात केल्यामुळेच कमी वयात एवढ्या पदकांची कमाई करता आली. ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याचे माझे धेय्य असून, त्यासाठी रोज सहा तास पोहण्याचा सराव करतो. - कृष्णा गडाख, जलतरणपटू  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com