मनपा अधिकाऱ्यांची रात्रभर ऑक्सिजन सिलिंडरसाठी धावाधाव; प्रशासनाची उडाली धावपळ!

oxygen cylinder.jpg
oxygen cylinder.jpg

नाशिक / मालेगाव : नाशिकसह जिल्ह्यात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याचा फटका येथील महापालिकेच्या दोन कोविड केअर सेंटरला बसला. मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री महापालिकेकडे फक्त २० सिलिंडर शिल्लक होती. दोन्ही सेंटरला रोज २४ तासांसाठी कमीत कमी ३६० सिलिंडरची आवश्‍यकता असते. सिलिंडर्सच्या कमतरतेमुळे ऑक्सिजनअभावी एखादा रुग्ण दगावतो की काय या विचाराने प्रशासनाची धावपळ उडाली.

मध्यरात्रीपासून पहाटे पाचपर्यंत धावाधाव

मध्यरात्रीपासून पहाटे पाचपर्यंत धावाधाव करून प्रशासनाने विविध ठिकाणांहून सिलिंडर जमा केली. महापालिकेच्या रुग्णवाहिकेतील सिलिंडरदेखील काढण्यात आले. त्यानंतर १२२ सिलिंडर उपलब्ध झाल्याचे आयुक्त त्र्यंबक कासार यांनी सांगितले.ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे समजताच कासार, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे आदींनी सहारा कोविड केअर सेंटरला रात्रीच धाव घेतली. येथे नगरसेवक मुश्‍तकीम डिग्निटी व सहकारी तत्पूर्वीच दाखल झाले होते. ऑक्सिजनचा तुटवडा आहे हे रुग्णांना समजू नये यासाठी पूर्ण खबरदारी घेण्यात आली. मंगळवारी रात्री नाशिकहून ऑक्सिजन उपलब्ध होणार नसल्याचा संदेश येताच यात भर पडली. या वेळी शिल्लक २० व उपलब्ध ३० अशी अवघी ५० सिलिंडर होती. 

रात्रभर जागूनही कासार यांची तातडीने बैठक
आयुक्त कासार यांनी तातडीने उपाययोजना करत धुळे येथून ३० सिलिंडर मागविण्यात आले. यासाठी सव्वापाच लाख रुपये पाठविण्यात आले. खासगी व अन्य रुग्णालयातही चौकशी करण्यात आली. महापालिकेच्या रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडरही वापरात घेण्यात आले. विविध ठिकाणाहून सव्वाशे सिलिंडर उपलब्ध झाल्याने बुधवारी दुपारपर्यंतची चिंता दूर झाली.

मालेगावला पहाटेपर्यंत १२२ सिलिंडर उपलब्ध 

रात्रभर जागूनही कासार यांनी तातडीने महापालिकेत याप्रश्‍नी बैठक घेतली व अधिकाऱ्यांना वाटेल ते करा मात्र ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करा, अशा सूचना दिल्या. शहर व परिसरात नव्याने ऑक्सिजन प्रकल्प सुरू करता येईल काय याबद्दलही बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प तातडीने सुरू होऊ शकतो, असे ऑक्सिजन पुरवठादाराने सांगितले. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रयत्नातून औरंगाबाद येथून शंभर सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. 

ऑक्सिजन तुटवड्याची गंभीरपणे दखल घेतली. धुळे, औरंगाबाद, नाशिकसह विविध ठिकाणांहून सुमारे दोनशे सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. शहापूर येथील एका पुरवठादाराशी बोलणे सुरू आहे. नाशिकहून ८० सिलिंडरची गाडी निघाली आहे. गुरुवारी (ता. १०) सायंकाळपर्यंत सिलिंडरची उपलब्धता होईल. नवीन प्रकल्पासंदर्भातील प्रस्तावही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -त्र्यंबक कासार, महापालिका आयुक्त, मालेगाव  

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com