VIDEO : 'तो' पिंजऱ्यात बंदिस्त...पिंजराभोवती घिरट्या घालत आईच्या डरकाळ्या....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

सायंकाळी माधव भंडारे यांच्या वस्तीवर पिंजरा लावला. गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास बिबट्याचा तो पिंजऱ्यात जेरबंद झाला. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या मादीने कित्येक वेळ डरकाळ्या फोडल्या. पिंजराभोवती घिरट्या घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

नाशिक : कसबे सुकेणे येथील माधव भंडारे यांच्या वस्तीवरील पिंजऱ्यात शुक्रवारी (ता. 14) बिबट्याचा बछडा जेरबंद झाला. बिबट्याच्या बछड्याचे अंदाजे वय एक ते दीड वर्ष आहे. अद्याप परिसरात एक मादीसह दोन बछडे असल्याचे माजी सरपंच नाना पाटील यांनी सांगितले. "सकाळ'ने बिबट्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत येवला येथील वनपाल क्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे वनाधिकारी जी. बी. वाघ, विंचूरचे वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक भय्या शेख यांनी गुरुवारी (ता.13) सायंकाळी माधव भंडारे यांच्या वस्तीवर पिंजरा लावला. गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास बिबट्याचा बछडा पिंजऱ्यात जेरबंद झाला. मात्र, त्याच्यासोबत असलेल्या मादीने कित्येक वेळ डरकाळ्या फोडल्या. पिंजराभोवती घिरट्या घातल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

बछड्याला बघण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी

जेरबंद केलेला बछडा सध्या निफाड येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत असून, त्याच्या तपासणीनंतर नागपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार जंगलात सोडण्यात येणार आहे. बछड्याला बघण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. दरम्यान, परिसरात बिबट्याची मादी व दोन बछडे अजून असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती कायम आहे. बिबटे जेरबंद करण्यासाठी वन विभागाने परत त्याच ठिकाणी पिंजरा लावला असून, आणखी दोन पिंजरे लावावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

 हेही वाचा > PHOTOS : शेवटी आईच 'ती'...बाळाला कसं सोडू शकते! अखेर ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..

पिंजऱ्यांची संख्या वाढवावी.
कसबे सुकेणे परिसरात बिबट्यांनी 15 दिवसांपासून उच्छाद मांडला आहे. मात्र, वनाधिकारी याकडे डोळेझाक करीत होते. याबाबत आमदार दिलीप बनकर यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेवरून वन विभागाने पिंजरा लावल्याने बछडा जेरबंद झाला. मात्र अद्याप बिबट्या व त्याचे बछडे परिसरात असल्याने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी. -धनंजय भंडारे, ग्रामस्थ, कसबे सुकेणे 

 हेही वाचा > गेला होता घर सावरायला पण, काळाचा आला घाला!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard terror in kasbe sukene nashik marathi news