जिल्ह्यात बरसल्या अवकाळीच्या सरी! कांद्यासह कापसाचे नुकसान; पंचनाम्याची मागणी 

संतोष विंचू
Friday, 20 November 2020

सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात कांदा, मकासह कापसाचे नुकसान झाले. महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात आली.

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (ता.१९) सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात कांदा, मकासह कापसाचे नुकसान झाले. महसूल प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे, अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात आली. गुरुवारी मालेगाव, सिन्नर, इगतपुरी, निफाड, देवळा तालुक्यांत अवकाळीच्या सरी बरसल्या. 

कांदा, मक्याचे नुकसान 
येवला : शहर व परिसरात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे दहा मिनिटे जोरदारपणे सरी कोसळल्या. सकाळपासून दमट वातावरणाने सर्वांना घामाघूम करताना दुपारी सव्वादोनच्या सुमारास येवला शहर-परिसरात अवकाळी पावसाच्या मध्यम स्वरूपातील सरी ५ मिनिटे बरसल्या. तालुक्यातील अंदरसूल व परिसरात दुपारी १५ ते २० मिनिटे अवकाळीने झटका दिला. यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या कपाशी, मका पिकांसह लागवड केलेल्या कांदा पिकाचे नुकसान होऊ लागले आहे.  

कांद्यासह कापसाचे नुकसान; पंचनाम्याची मागणी 
सर्वाधिक नुकसान शेतातील लाल व रांगडा कांद्याचे होणार असून, अगोदरच रोगाच्या प्रादुर्भावामुळे वाफ्यात रोपे कुजले असून, आता पुन्हा अवकाळी पावसामुळे मावा व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भावदेखील होणार आहे. बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांनी घेतलेले डोंगळे व वेचणीला आलेला कापूस भिजून खराब होणार आहेत. द्राक्षबागांची फळकूज वाढण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे धुक्याची शक्यता बळावल्याने कांदा उत्पादक शेतकरी हादरले आहे. 

हेही वाचा > महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा शोध; अंगठीतील हिरा गिळून केला होता देहत्याग

देवळा परिसरात शेतकरी चिंताग्रस्त 
देवळा : तालुक्याच्या काही भागात गुरुवारी अवकाळीच्या सरी बरसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. यापूर्वी अतिपावसामुळे कांद्याचे रोप व खरीप कांदे यांच्यावर बुरशीजन्य रोग आल्याने मोठे नुकसान झाले आहे. आता नवीन कांद्याचे बियाणे टाकत रोप करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न असताना गुरुवारी पुन्हा पावसाच्या सरी पडल्याने शेतकऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. देवळा तालुक्यात वाखारी, खर्डे, लोहोणेर व इतर परिसरात सरी बरसल्या. दिवसभर ढगाळ वातावरण व दमट हवामान यामुळे पावसाची शक्यता असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. आता टाकलेली रोपे जर खराब झाली तर उन्हाळी कांद्यांची लागवड करणे अशक्य होणार आहे. 

हेही वाचा > संतापजनक! २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल

आता जर पुन्हा बेमोसमी पाऊस पडला, तर कांद्याचे रोप व कांद्याचे पीक यांचे मोठे नुकसान होईल. शेतकऱ्यांच्या साऱ्या मेहनतीवर पाणी फिरेल. शासनाने यापूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी. -शिवाजीराव पवार, तालुकाध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

कसबे सुकेणे परिसरात पावसाच्या सरी 
कसबे सुकेणे : परिसरातील मौजे सुकेणे, ओणे, थेरगाव, शिरसगाव आदी परिसरात सकाळी नऊच्या दरम्यान जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. पंधरा मिनिटे झालेल्या जोरदार पावसामुळे फ्लोरिंगमध्ये आलेल्या द्राक्षबागांसह इतर द्राक्षबागांचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच उगवलेल्या कांद्याच्या रोपांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच कसबे सुकेणे परिसरात या वर्षी उशिरा द्राक्षबागांची छाटणी मोठ्या प्रमाणात आहे. यात ज्या द्राक्षबागा थोड्याफार प्रमाणात आलेल्या आहेत, त्यांचे फेल फूट काढणे सुरू आहे, अशा द्राक्षबागांवर ही ‘लावणी’ या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loss of farmer due to Untimely rains in district nashik marathi news