मालेगाव अपहरण व दरोडा प्रकरण : गुन्हे शाखेकडून २४ तासांच्या आत संशयितांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

साथीदारांनी मर्सडिज कारला कार आडवी लावून कारमध्ये बसलेला मित्र प्रवीण कदम याला जबरदस्तीने ओढून घेत कारमधून अपहरण करीत फरारी झाले. संशयितांनी आपला मोबाईलही हिसकावून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी (ता.२८) पहाटे तालुका पोलिसांनी अपहरण व रस्तालुटीचा गुन्हा दाखल केला.

नाशिक / मालेगाव : मनमाड-मालेगाव रस्त्यावरील कौळाणे शिवारातील हॉटेल साईप्रसादजवळून दोन वेगवेगळ्या कारमधून आलेल्या आठ जणांनी निमगुले येथील प्रवीण केशव कदम (वय ४२) यांचे अपहरण केले. संशयितांनी प्रवीण यांचा साथीदार राजेंद्र कदम यांच्याजवळील दहा हजारांचा सॅमसंग मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. रविवारी (ता.२७) रात्री पावणेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. आर्थिक व्यवहारातून व पैशांच्या देवाणघेवाणीतून हे अपहरण झाल्याचे समजते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने चार संशयितांना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.

कौळाणे शिवारातून पुरुषाचे अपहरण : चौघे संशयित गुन्हे शाखेच्या ताब्यात

राजेंद्र कदम (३८, रा. निमगुले) यांनी दिलेल्या तक्रारीत अमित पगार (रा. पाडळदे, ता. मालेगाव) याच्यासह सफेद व काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या त्याच्या  साथीदारांनी मर्सडिज कारला कार आडवी लावून कारमध्ये बसलेला मित्र प्रवीण कदम याला जबरदस्तीने ओढून घेत कारमधून अपहरण करीत फरारी झाले. संशयितांनी आपला मोबाईलही हिसकावून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी (ता.२८) पहाटे तालुका पोलिसांनी अपहरण व रस्तालुटीचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे व सहकाऱ्यांनी मध्यरात्रीच घटनास्थळी भेट देऊन वेगाने तपासचक्र फिरविले.

पोलीसांनी फिरविली वेगाने तपासचक्र

जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. भदाणे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील व सहकाऱ्यांना समांतर तपासणी चौकशी करण्याचे निर्देश दिले. सोमवारी रात्री उशिरा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघा संशयितांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा गुन्हे शाखेचे पथक या चौघांना घेऊन मालेगावकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. अपहरण केलेल्या प्रवीण यांचा जबाब व संशयितांच्या चौकशीनंतरच अपहरणाचे कारण समजले आहे..  

संशयितांच्या चौकशीनंतरच अपहरणाचे कारण समजले

ताब्यात घेतलेल्या संशयितांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुमारे ३-४ वर्षांपूर्वी प्रविण कदम यांच्या सांगण्यावरून फ्युचर मेकर प्रा.लि. कंपनी हिस्सार या कंपनीत १० ते १२ लाख रुपये गुंतवणूक केलेली होती. त्यानंतर ती कंपनी बंद पडली. त्यानंतर कदम यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी आम्ही केली. परंतु कदम यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. म्हणून निमगुळे येथे जावून त्यांचा शोध घेतला. कदम तिथे न भेटल्याने कौळाणे येथे कदम असल्याची माहिती मिळाली. त्याक्षणी तिथे कदमचे अपहरण करून त्याला कारमध्ये बसवून आणले. त्याला सोडून देण्याच्या मोबदल्यात त्याच्या घरच्या लोकांकडे २० लाख रुपयाच्या खंडणीची मागणी केली होती. ही सर्व कबुली दिल्याने संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुढील कारवाईसाठी मालेगाव तालुका पोलीस ठाणे येथील पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

संशयितांची पार्श्वभूमी

या संशयितांची पार्श्वभूमी जाणून घेतली असता संशयित प्रणव बोरसे याच्यावर घरफोडी, दरोडा, जबरी चोरी, खून यांसारखे १६ ते १७ गुन्हे दाखल आहेत. संशयित कुणाल बागुल तसेच संशयित प्रकाश सोनावणे या दोघांवरही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon kidnapping and robbery case nashik marathi news