PHOTOS : मल्‍लखांब प्रात्‍यक्षिकांतून आदिशक्‍तीचा जागर; यशवंत व्‍यायाम शाळेत उपासना, व्‍यायामाची अनोखी सांगड 

अरुण मलाणी
Sunday, 25 October 2020

नवरात्राच्या नऊ दिवसाचे महत्त्व असलेल्या वेषभूषांमध्ये यशवंत व्यायाम शाळेच्या मलखांबपटू आणि प्रशिक्षकांनी आसनाच्याद्वारे सांगड घालण्याचा प्रयत्न केला.

नाशिक : नवरात्रोत्‍सवानिमित्त सर्वत्र चैतन्‍यमयी वातावरण असताना यशवंत व्‍यायामशाळेतही मल्‍लखांब विभागातर्फे उत्‍सव काळात उपासना आणि व्‍यायामाची अनोखी सांगड बघायला मिळाली. मल्‍लखांब प्रात्‍यक्षिकांतून आदिशक्‍तीचा जागर करण्यात आला. यावेळी युवतींनी देवीच्‍या विविध अवतारांमध्ये प्रात्‍यक्षिक सादर करताना लक्ष वेधले. 

यशवंत व्यायाम शाळा मल्लखांब विभागाचे प्रशिक्षक यशवंत जाधव, उत्तरा खानापुरे, तनया गायधनी, पंकज कडलग, ऋषिकेश ठाकूर, अक्षय खानापुरे यांच्या संकल्पनेतून व नवरात्री उत्सवानिमित्त व्यायामाचे आणि खेळाचे महत्त्व विशद करण्यात आले. यासाठी नवरात्राच्या नऊ दिवसाचे महत्त्व असलेल्या वेषभूषांमध्ये यशवंत व्यायाम शाळेच्या मलखांबपटू आणि प्रशिक्षकांनी आसनाच्याद्वारे सांगड घालण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा > हाऊज द जोश! पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशकात दाखल;

कालरात्री देवी शक्तीचा सुयोग्य वापर करून नकारात्मक गोष्टींवर विजय प्राप्त करते. तसेच आपण मल्लखांबाचा नियमित सराव करून शक्ती प्राप्त करू शकतो व त्या शक्तीचा वापर करून आपल्यातल्या नकारात्मक सवयींवर मात करू शकतो, असा संदेश यावेळी दिला. नऊ देवींच्या विविध गुणांमधून व मल्लखांबाच्या सरावामधून आपण व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे घेतल्‍यास त्‍‍याचा नक्कीच फायदा होतो, असा संदेशही या सादरीकरणातून दिला. 


महिलांसाठी विशेष महत्त्व 

महिलांच्या शरीरामध्ये पोषक तत्त्वांची कमतरता जाणवते. ती भरून काढण्यासाठी महिला योग्य व्यायाम व आहार घेत नसल्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते. ही गोष्ट हेरून महिलांनी व्‍यायाम करताना सुदृढ जीवन जगण्यावर भर दिला पाहिजे, असा संदेशही उपक्रमातून देण्यात आला. यशवंत व्यायाम शाळेच्या मल्लखांब विभागाच्या या उपक्रमासाठी यशवंत व्यायामशाळेचे अध्यक्ष दीपक पाटील आणि सर्व कार्यकारी मंडळाचे सहकार्य लाभले. 

हेही वाचा > पिंपळगावच्या टोमॅटोचा देशभरात डंका! सव्वाचारशे कोटी शेतकऱ्यांच्या पदरात 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mallakhamba demonstration In Yashwant Gymnasium nashik marathi news