कोण असेल ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष? नाशिककरांची उत्सुकता शिगेला

sahitya samelan.jpg
sahitya samelan.jpg

नाशिक : मार्चअखेर होऊ घातलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतची उत्सुकता आता नाशिकसह अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे. संमेलनाच्या नियोजन व तयारीसाठी आयोजक जीवतोड मेहनत घेत आहेत. आयोजक संस्थेला नाशिककरही तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे, संमेलनाध्यक्षपदासाठी रोज नवे नाव समोर आणायचा प्रयत्न असेल तर? सध्या याचीच प्रचीती नाशिकमध्ये येत आहे. 

‘इच्छुकां’ची नावे अध्यक्षपदासाठी समोर

कुठल्या ना कुठल्या वादाशिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीच होत नाही की काय, असा संशय आता येऊ लागला आहे. विशेषत: अध्यक्षपदाच्या निवडीवरून होणारे वाद नित्याचेच झाल्याने, महामंडळाने काही वर्षांपूर्वी स्तुत्य निर्णय घेत निवडणुकाच रद्द केल्या आहेत. त्याऐवजी संलग्न संस्थांकडून अध्यक्षपदासाठी नावांचे प्रस्ताव मागविण्यात येऊ लागले. अर्थात ही प्रक्रिया संबंधित संस्था आणि महामंडळाच्या स्तरावरच अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र ज्यांचा साहित्य क्षेत्राशी संबंधही नाही अशा काही संस्था अन्‌ व्यक्तींकडूनही प्रस्ताव येताहेत. त्यातून जवळपास सगळ्याच ‘इच्छुकां’ची नावे अध्यक्षपदासाठी समोर येत आहेत. परिणामी, साहित्य संमेलनाचे नियोजन, तयारी आणि वातावरणनिर्मितीलाही योग्य दिशा मिळण्यास अडथळे येत असल्याचे दिसून येत आहे. 

नाशिककरांचे गाडे अद्याप संमेलनाध्यक्ष निवडीवरच

मुळात, यंदाचे संमेलन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय होताच, जो उत्साह नाशिककरांमध्ये दिसून यायला हवा होता, तो अजूनही दिसत नाही. त्याऐवजी नाशिककरांचे गाडे अद्याप संमेलनाध्यक्ष निवडीवरच अडकल्याचे दिसून येत आहे. जणू काही संमेलनाध्यक्ष निवडण्याची जबाबदारीच नाशिककरांना पेलावी लागणार आहे. त्यातून, या शर्यतीत आतापर्यंत डझनभर नावे समोर आली आहेत. त्यात प्रामुख्याने अनिल अवचट, मनोहर शहाणे, यशवंत मनोहर, भारत सासणे, डॉ. रवींद्र शोभणे यांच्यापासून तर आता प्रेमानंद गज्वींपर्यंत नावांचा समावेश तर आहेच; पण काही नावे अशीही आहेत, की ज्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. त्यामुळे उद्या स्वागताध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर आणखी काही नावे समोर आली तर नवल वाटू नये, अशी परिस्थिती आहे. 

--अडथळे आणू नयेत 

संमेलनाध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे येत असलेल्या नावांपैकी काही नावे निश्‍चितच प्रतिष्ठित आहेत. याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण, मुळात अशा शिफारशी करण्यापेक्षा, अध्यक्ष निवडीचा महत्त्वपूर्ण निर्णय महामंडळाला घेऊ द्यावा. त्यात उगाच लुडबुड करून चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये, एवढीच माफक अपेक्षा साहित्यप्रेमींना आहे. 

वातावरणनिर्मितीसाठी... 

नाशिकला यापूर्वी २००५ मध्ये ‘न भूतो न भविष्यति’ संमेलन झाले आहे. यंदाचे संमेलनही असेच भव्यदिव्य व्हावे यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी नाशिककरांची आहे. मात्र, त्यासाठी तयारी करतानाच यथोचित वातावरणनिर्मिती होणे गरजेचे आहे. त्यातच, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटामुळे एकूणच मराठी साहित्य व्यवहारात जणू मरगळ आलेली आहे. ही मरगळ झटकण्याची अन्‌ त्यानिमित्ताने ‘साहित्यनगरी नाशिक’ अशी नवी ओळख निर्माण करण्याची ही एक मोठी संधी आहे. त्यामुळे अध्यक्षपद असो किंवा अन्य कोणताही मुद्दा असो, त्याभोवती अडकून नाशिककरांनी वेळ दवडू नये, अशी ही वेळ आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com