भाजप आमदार कोरोना पॉझिटिव्ह; तरीही 'मराठा' बैठकीला उपस्थित? चर्चेला उधाण

अरुण मलाणी
Monday, 14 September 2020

 मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात झालेल्‍या बैठकीत भाषण करण्यापासून उपस्‍थितांनी आमदारांना रोखलेही होते. यानंतर त्‍यांनी मोजक्‍या शब्‍दांमध्ये मनोगत व्‍यक्‍त केले.

नाशिक :  मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात झालेल्‍या बैठकीत भाषण करण्यापासून उपस्‍थितांनी आमदारांना रोखलेही होते. यानंतर त्‍यांनी मोजक्‍या शब्‍दांमध्ये मनोगत व्‍यक्‍त केले. त्‍या वेळी त्‍यांच्‍या चेहऱ्यावर मास्‍कदेखील नव्‍हता. अशा एक ना अनेक गोष्टींची आता चर्चा व्हायला लागली आहे.

स्वॅब दिल्यानंतर बैठकीला गेल्याच कशा? 

नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. सकाळी मराठा आरक्षणाबाबत झालेल्‍या बैठकीत उपस्‍थित असल्‍याने तेथील सर्वांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मुंबई अधिवेशन आणि जळगाव येथे प्रवास केल्‍यामुळे सावधगिरी म्‍हणून केलेल्‍या कोरोनाच्‍या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याचे आमदार फरांदे यांनी सांगितले.

चेहऱ्यावर मास्‍कदेखील नव्‍हता

दरम्‍यान, चाचणी केलेली असताना अहवाल येण्यापूर्वी त्‍या बैठकीला कशा उपस्‍थित राहिल्‍या, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जातो आहे. मराठा आरक्षणाच्‍या संदर्भात झालेल्‍या बैठकीत भाषण करण्यापासून उपस्‍थितांनी आमदार फरांदे यांना रोखले होते. यानंतर त्‍यांनी मोजक्‍या शब्‍दांमध्ये मनोगत व्‍यक्‍त केले. त्‍या वेळी त्‍यांच्‍या चेहऱ्यावर मास्‍कदेखील नव्‍हता. माध्यमांसोबत संवाद साधताना बैठकीतील प्रमुखांसह आमदार फरांदे यांचे छायाचित्र पुढे आले आहे. बैठक आटोपल्‍याच्‍या काही वेळाने आमदार फरांदे यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदर्शनास आले. त्‍यामुळे बैठकीस उपस्‍थित सर्वांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. चाचणी केली असताना, अहवालाची प्रतीक्षा करण्याऐवजी बैठकीस उपस्‍थित राहण्याबद्दल प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले जात आहे. दरम्‍यान, संपर्कात आलेल्‍या व्‍यक्‍तींनी काळजी घेण्यासह आवश्‍यकता भासल्‍यास स्‍वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन आमदार फरांदे यांनी केले आहे.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Devyani Farande infected with corona nashik marathi news