PHOTOS : भुजबळांच्या होमग्राउंडवर रोहित पवारांचा संपर्काचा सिक्सर

संपत देवगिरे 
Sunday, 27 December 2020

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अन् जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाशिक हे होमग्रांउड आहे. मात्र आज राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवारांनी या भुजबळांच्या होमग्राउंडवर शब्दशः संपर्काचा सिक्सर लागवाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

नाशिक : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अन् जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाशिक हे होमग्रांउड आहे. मात्र आज राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवारांनी या भुजबळांच्या होमग्राउंडवर शब्दशः संपर्काचा सिक्सर लागवाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

आमदार रोहित पवार यांनी आज जिल्ह्यात दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. मात्र ज्या पध्दतीने त्यांचे जागोजागी स्वागत करण्यात आले. त्यांना आग्रह झाला, त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी‌ कार्यकर्त्यांचा गराडा पडत होता ते सगळे मात्र एक वेगळाच संदेश देत होते.

कॉलेज रोडला टपरीवर चहाचे छुरके..

शहरात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पवारांचे उत्साहात स्वागत केले. पवार नव्याने व्यवसाय, व्यापारात स्थिरावणाऱ्या युवकांच्या संस्थांना भेटी देत, चर्चा करीत होते. भेटणाऱ्या अनेकांत न कंटाळता हसतमुखाने रमतही होते. अगदी दुपारी शहराच्या कॉलेज युवक, युवतींचा अड्डा असलेल्या कॉलेज रोडवरील "चाय की टपरी' येथे चहाचे झुरके घेत ते युवकांच्या चर्चेत त्यांचे प्रश्‍न समजून घेत होते. मात्र यामध्ये गंमत झाली ती विहितगाव येथील क्रिकेटच्या मैदानावर. 

Image may contain: 16 people, including Prasad Pathak, Abhijeet Bhosale and Jyoti Sonawane, people standing

पवारांची स्वारी थेट मैदानावर

आमदार पवार देवळाली कॅम्प येथील कार्यक्रम ओटपून नाशिककडे निघाले असतांना रस्त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते विक्रम कोठुळे समर्थकांसह स्वागतासाठी आले होते. स्वागत स्वीकारून पुढे जाऊ, असा रोहित पवार यांचा कयास होता. मात्र स्वागत केल्यावर विक्रम कोठुळे यांनी इथे क्रिकेटचे मैदान आहे. तुम्ही तिथे यावे, असा युवकांचा आग्रह आहे. त्यामुळे तुम्ही चला, असे थेट म्हणत रोहित पवारांच्या होकाराची वाटही न पाहता बुलेटवर कोठुळेंच्या मागे बसून आमदार पवारांची स्वारी मैदानावर पोचली. यानिमित्ताने त्यांनीही बुलटे रायडिंगचा आनंद घेतला. मैदानावर गेल्यावर युवकांचा त्यांना अक्षरशः गराडाच पडला. 

 

Image may contain: 7 people, including Aditya Dusane

सेल्‍फी, बुलेट अन् क्रिकेटही 

त्या प्रत्येकाचे स्वागत स्वीकारत, सेल्फी, मोबाईलवर फोटो, व्हिडिओ शूटिंग झाले. त्यानंतर युवकांनी त्यांनी क्रिकेट खेळावे, असा आग्रह केला. हा आग्रह त्यांना मोडता आला नाही. ते क्रिकेट खेळले. दोन- चार बॉलवर त्यांनी ताकदीने फटके मारण्याचे आपले कसब दाखवून नंतर ते पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. गणेश कोठुळे, प्रशांत पाटील, अविनाश ओहोळ, भारत काटकर, नीलेश कोठुळे हे युवक मैदानावर फिल्डिंग करीत होते. रोहित पवारांचे फटके पाहून तेदेखील त्यांच्या प्रेमात पडले. परत जाताना पवार यांनी विक्रम कोठुळे या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्याची विचारपूस करीत त्याच्या संपर्काचे कौतुक करण्यास ते विसरले नाही.

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

या दौऱ्यामध्ये  रोहित पवारांनी बुलेटवर रपेट मारली  सोबत मैदानात क्रिकेट खेळणाऱ्यांनी आग्रह केल्यावर क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजीही केली. एका अर्थाने तो जनसंपर्काचा सिक्‍सरच ठरला. एकंदरच छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यातील या दौऱ्यात त्यांनी संपर्काचा सिक्‍सर मारलाच, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

आमदार पवार यांच्यासमवेत व्यापारी बॅंकेचे ज्येष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विभागीय अध्यक्ष मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार, शिवाजी हांडोरे, संजय हांडोरे, रोहित मते, मनीष हांडोरे, प्रशांत आडके, जिल्हाध्यक्ष पुरषोत्तम कडलग, गणेश गायधनी आदी पदाधिकारी होते.

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Rohit Pawar enjoyed playing cricket during his visit to Nashik marathi news