सिन्नर येथे उद्योगांचा भूखंड बिल्डरांच्या घशात; आमदार हिरेंचा आरोप व चौकशीची मागणी 

विक्रांत मते
Tuesday, 20 October 2020

सिन्नर औद्योगिक वसाहतीतील असाच एक ४२ एकरचा बंद पडलेल्या कारखान्याचा भूखंड एमआयडीसीने एका उद्योगासाठी विक्री केला. परंतु कालांतराने त्यावर उद्योग न उभारता ज्या व्यक्तीला जागा देण्यात आली त्या बिल्डरने ती जागा चढ्या भावाने दुसऱ्या एका उद्योगाला एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला

नाशिक : औद्योगिक विकास महामंडळाने सिन्नर औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्या एका उद्योगाची ४२ एकर जागा दुसऱ्या एका उद्योगासाठी दिली. परंतु कालांतराने ती जागा बिल्डरला विक्री करण्यात आली. पुढे तीच जागा चढ्या दराने पुन्हा उद्योगासाठी विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आमदार सीमा हिरे यांनी केला असून, यासंदर्भात चौकशी करावी, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

सिन्नर येथे उद्योगांचा भूखंड  बिल्डरांच्या घशात; आमदार हिरेंचा आरोप​
उद्योगांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती व्हावी, या उद्देशाने औद्योगिक विकास महामंडळाकडून भूखंडाचे वाटप केले जाते. सातपूर, अंबड व सिन्नर औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात उद्योगांसाठी भूखंड पाडण्यात आले. त्यावर उद्योग स्थिरावले व कालांतराने त्यातील काही उद्योग बंद पडले. उद्योग बंद पडल्यानंतर एमआयडीसीने ती जागा ताब्यात घेणे अपेक्षित असते. सिन्नर औद्योगिक वसाहतीतील असाच एक ४२ एकरचा बंद पडलेल्या कारखान्याचा भूखंड एमआयडीसीने एका उद्योगासाठी विक्री केला. परंतु कालांतराने त्यावर उद्योग न उभारता ज्या व्यक्तीला जागा देण्यात आली त्या बिल्डरने ती जागा चढ्या भावाने दुसऱ्या एका उद्योगाला एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला. बंद पडलेले भूखंड कारखानदारांना दिल्यास रोजगाराची नवी संधी प्राप्त होऊ शकते. मात्र, सरकारी अधिकारी उद्योग बंद पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप आमदार हिरे यांनी केला. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

भूखंड विक्रीच्या नियमांची पायमल्ली 
उद्योग उभारण्यासाठी कमी दरात शासकीय भूखंड घ्यायचा व त्या जागेवर उद्योग उभा न करता कालांतराने तोच भूखंड एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिल्डरांना विकायचा. बिल्डरांकडून पुन्हा हे भूखंड तुकडे पाडून उद्योगांसाठी विकण्याचा प्रकार सध्या नाशिक औद्योगिक वसाहतीत सुरू आहे. सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत अनेक वर्षांपासून एमआयडीसीकडे भूखंडांची मागणी केली जात आहे. भूखंड शिल्लक नसल्याचे उत्तर दिले जाते. मात्र बंद पडलेल्या उद्योगांच्या जमिनी ताब्यात घेऊन त्या बिल्डरांना विक्री करायच्या. पुढे भूखंडाचे तुकडे पाडून चढ्या दराने विक्री करण्याचा धंदा सुरू झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

एमआयडीसी कार्यालयात बंद पडलेल्या उद्योगांच्या भूखंड विक्रीत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असून, यात अधिकारी व गुंतवणूकदारांचे संगनमत आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी. -सीमा हिरे, आमदार  
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA seema hiray allegation on Industrial plot at Sinnar nashik marathi news