"मुख्यमंत्री ठाकरे, अशोक चव्हाण यांच्याकडून मराठा समाजाची दिशाभूल" विनायक मेटेंचा घणाघात

vinayk mete.jpg
vinayk mete.jpg

नाशिक : राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीमुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या सुनावणीला १ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री अशोक चव्हाण जबाबदार आहेत. मराठा आरक्षणासह समाजाच्या प्रश्‍नांवर काम करण्यासाठी राज्यातील नऊ मराठा संघटनांनी एकत्रित येत समन्वय समितीची स्थापना केली आहे. समितीच्या सोमवार (ता. ३)च्या पहिल्याच बैठकीत ६ ऑगस्टपासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती आमदार विनायक मेटे यांनी दिली. 

विनायक मेटे : मराठा आरक्षणासंदर्भात ६ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यभर आंदोलन 
शासकीय विश्रामगृहात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाज आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आरक्षण समितीचे अध्यक्ष व मंत्री अशोक चव्हाण बाजू मांडत आहेत. मात्र, याबाबत राज्य सरकारबरोबरच चव्हाण फारसे गंभीर नाहीत, असा घणाघात आमदार मेटे यांनी केला. सरकार व प्रशासनातील काही जण आरक्षणाविरोधात भूमिका घेणाऱ्यांना मदत करत आहेत. त्यामुळे आरक्षणविरोधकांकडे मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे जमा होत आहेत. दुसरीकडे आरक्षणाची बाजू मांडणारे कागदपत्रांविना व अपुऱ्या तयारीने न्यायालयात उपस्थित राहत असल्याकडे श्री. मेटे यांनी लक्ष वेधले. 

हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता - मेटे
याविरोधात ६ ऑगस्टपासून सरकारविरोधात आंदोलन करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. ७ ऑगस्टला राज्यातील सर्व आमदार व खासदारांना विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करण्यासाठी पत्र दिले जाईल, तसेच मराठा व अन्य समाजातील नागरिकांनीही ८ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांकडे फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरक्षणाची मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. ९ ऑगस्ट क्रांतिदिनी राज्यभरात आंदोलन केले जाणार असून, त्याची दिशा लवकरच ठरविली जाईल. दरम्यान, श्री. चव्हाण यांना समितीतून बाजूला करून ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावी. सरकार लबाडी करत असल्याने समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची शक्यता असल्याने आंदोलनाबाबत ठाम असल्याचे मेटे यांनी सांगितले. 


समन्वय समितीचे नवनियुक्त सदस्य करण गायकर, छत्रपती युवा सेनेचे गणेश कदम, संजय सावंत, रवींद्र काळे, ज्ञानेश्‍वर गायकवाड, शरद तुंगार, संजय पाटील-घाटणेकर, गंगाधर काळकुटे आदी उपस्थित होते.  
 

रिपोर्ट - दत्ता जाधव

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com