"आता वर्षभराचा रिचार्ज फक्त ९९९ रुपयात.." तुम्हालाही आलाय का हा मेसेज? तर मग सावधान!

fake msg.jpg
fake msg.jpg

नाशिक : वर्षभराच्या वैधतेसाठी दोन हजार ४०० रुपये किमतीचा रिचार्ज फक्त ९९९ रुपयांत करत असल्याच्या संदेशांचा सध्या सुळसुळाट सुरू आहे. विविध कंपन्यांसाठी ही योजना असल्याचे सांगून युवकांना जोडून साखळी बनविण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. फ्रँचाइजीच्या नावानेही पैसे वसुलीची धक्‍कादायक बाब उघडकीस आली आहे. कंपनीतर्फे अशा योजना उपलब्ध नसताना लॉकडाउनच्या काळात बेरोजगारी वाढलेल्या काळात चेन मार्केटिंगच्या नावाखाली मोठा घोटाळा सुरू असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. 

युवकांना लावले जातेय गळाला; फ्रँचाइजीच्या नावानेही पैसेवसुली ​

खासगी टेलिफोन ऑपरेटरच्या प्रीपेड कार्डावर वर्षभराचा रिचार्ज ९९९ रुपयांत उपलब्ध असल्याची योजना दिली जाते आहे. मोबाईल रिचार्जसाठी थेट कंपनीला पैसे अदा केले जातात; परंतु या योजनांत फोनपे किंवा जीपेसारख्या ॲपद्वारे पैसे अदा करण्यास गळ घातली जाते. ९९९ रुपये अदा केल्यानंतर २४९ रुपयांचे रिचार्ज देत दर महिन्याला आपोआप वैधता वाढत जाईल, असा दावा केला जातो. योजनेत कंपनीतर्फे उपलब्ध योजनेप्रमाणे दीड जीबी डेटा, मोफत कॉलिंग, शंभर एसएमएस आदी सुविधा उपलब्ध असल्याचे सांगितले जाते, तर रिचार्ज केल्यानंतर पैसे कमविण्यासाठी आणखी काही सदस्यांना योजनेत सहभागी करून जोडून घेण्याचे आमिष दाखवून चेन मार्केटिंगद्वारे पैसे मिळविले जात आहेत. त्यामुळे मोबाईल कंपन्यांच्या नावाने परस्पर पैसे वसुलीची ही सगळीच कार्यपद्धती संशयास्पद आहे. 

चेन मार्केटिंगद्वारे मोबाईल रिचार्ज घोटाळा ​
रिचार्जसोबत फ्रॅंचाइजीचा उद्योगही जोरात आहे. त्यात कंपनीला ९९९ रुपये पाठविल्यानंतर संबंधितांचा आयडी तयार केला जातो. त्यानंतर पुन्हा ९९९ चा एक रिचार्ज केल्यास सांगितले जाते. फ्रँचाइजीसाठी दहा हजार रुपये कंपनीला द्यायचे असतात. त्यातील दोन हजार रुपये नॉन रिफंडेबल डिपॉझिट म्हणून घेतले जातात, तर उर्वरित आठ हजार रुपये रिचार्जसाठी (आठ पिन) दिले जातात. फ्रॅंचाइजी न घेता केवळ रिचार्जद्वारे काम सुरू केल्यास दिवसाला पाच ग्राहकांना जोडता येते. मात्र फ्रँचाइजी घेतलेल्यांना दिवसाला दहा व्यक्‍ती जोडण्याची संधी असल्याचे सांगितले जाते. जोडलेल्या प्रतिव्यक्‍तीकरिता दोनशे रुपये कमिशनचे जाहिरात करून सोशल मीडियावर टाकण्याचे आवाहन केले जाते. आठवड्याला २५ हजार रुपयांपर्यंत कमाई करण्याचे आमिष या योजनेद्वारे दाखविले जाते आहे. 

अशा योजनाच नाहीत 
या संदर्भात जिओ कंपनीच्या ग्राहकसेवा केंद्राशी संपर्क साधला असता, कंपनीकडून अशी कोणतीही योजना (प्लॅन) उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. ग्राहकांनी अशा योजनेवर विश्वास ठेवू नये. पैसे अदा करताना फसवणूक होणार नाही, याची खात्री करून घ्यावी, असे सांगण्यात आले. 

ग्रामीण भागातील तरुणाई गळाला 
या योजनेत सहभागी होण्यात ग्रामीण भागातील तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. सध्याच्या परिस्थितीत बेरोजगारीचा प्रश्‍न निर्माण झालेला असल्याने, चेन मार्केटिंगच्या या योजनेत सहभागी होत पैसे कमविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. दरम्यान, योजनेचा डोलारा कोसळल्यानंतर पैसे अदा केलेल्या ग्राहकांच्या रोषाला अशा तरुणाईला सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्‍त केली जाते आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com