मनपाकडून साडेतीनशेहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई; 'हे' आहे कारण

विक्रांत मते
Thursday, 17 September 2020

महापालिकेचे सफाई कर्मचारी शहरातील अन्य भागात वर्ग करण्यात आले. परंतु त्यातील साडेतीनशेहून अधिक कर्मचारी नियुक्त केलेल्या जागेवर हजर होत नसल्याचा व ते कामावर हजर होत नसल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 

नाशिक : शहरातील रस्त्यांची झाडलोट करण्यासाठी पूर्व व पश्‍चिम विभागात महापालिकेतर्फे खासगी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यानुसार काम सुरू करण्यात आले. महापालिकेचे सफाई कर्मचारी शहरातील अन्य भागात वर्ग करण्यात आले. परंतु त्यातील साडेतीनशेहून अधिक कर्मचारी नियुक्त केलेल्या जागेवर हजर होत नसल्याचा व ते कामावर हजर होत नसल्याचा दावा करण्यात आला असून, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 

अद्यापही इतके कर्मचारी गैरहजर

पूर्व व पश्‍चिम विभागात खासगीकरणातून साफसफाई करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार सातशे कर्मचारी नियुक्त करण्यात आले. महापालिकेचे दोन्ही विभागातील पाचशेहून अधिक कर्मचारी सिडको, नाशिक रोड, पंचवटी व सातपूर विभागात वर्ग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी जाण्यास नकार दिला आहे. अनेक महिन्यांपासून प्रशासनविरुध्द सफाई कर्मचारी अशी लढाई सुरू आहे. प्रशासनाने एकत्रित बदलीची ऑर्डर काढल्यानंतर बदलीच्या ठिकाणी जाण्यास सफाई कर्मचारी तयार नाहीत. ज्यांची बदली करण्यात आली, त्यातील २१६ कर्मचारी हजर झाले. तर ३७४ कर्मचारी गैरहजर आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कर्मचारीच हजर होत नसल्याने त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

सेवानिवृत्त व मृत कर्मचाऱ्यांची नावे असल्याचा आरोप

सफाई कर्मचारी संघटनेचे सुरेश मारू यांनी महापालिकेतर्फे जे कर्मचारी गैरहजर दाखविले जात आहे. ते प्रत्यक्षात पूर्व व पश्‍चिम विभागात कार्यरत असल्याचा दावा केला जात आहे. पती-पत्नी एकाच ठिकाणी कामाला असावे, असा नियम आहे. पूर्व व पश्‍चिम विभागात १२० पती-पत्नी जोडी आहेत. ७० दिव्यांग तर, सफाई कर्मचाऱ्यांमध्ये सेवानिवृत्त व मृत कर्मचाऱ्यांची नावे असल्याचा आरोप करण्यात आला. महापालिकेने स्वतंत्र ऑर्डर न काढता प्रत्येकाच्या नावाने बदलीची ऑर्डर द्यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than three and a half hundred Action on cleaners nashik marathi news