Nashik Accident : मायलेकांचे दैव बलवत्तर!.. आई अर्धा तास मृत्यूच्या विळख्यात...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

खिडकीची काच फोडून बाहेर येणारा तो पहिलाच. त्याला पाहून विहिरीच्या कठड्यावरच्या लोकांनी एकच गलका केला. पण, ब्रह्माची नजर त्याच्या आईला शोधत होती. त्याने पुन्हा खिडकीतून बसच्या आतमध्ये पाहिले तर, अर्धी अधिक बस पाण्यात होती. त्याला काहीच दिसत नव्हते. आईला हाक मारत तो पुन्हा बसमध्ये जाऊ पाहत असतानाच, दोघांनी त्याला रोखले.

नाशिक : खूप जोरात असलेली बस अचानक हेलकावली अन्‌ क्षणात समोरून आलेल्या रिक्षाला धडकली. काय होतंय हे कळायच्या आत आम्ही पाण्यात... सिटांवर पाय देत मी बसच्या मागच्या मोठ्या खिडकीकडे धावलो... काच फोडली अन्‌ टपावर आलो... बाहेर गर्दी झालेली... आई दिसत नव्हती... आईला हाका मारत होतो... खिडकीतून बसमध्ये डोकावून आईला शोधत होतो... पण ती दिसेना... अश्रू थांबत नव्हते... परत बसमध्ये जाऊ लागलो तर काही लोकांनी बसवर उड्या घेतल्या आणि मला रोखलं... हा आँखोदेखा हाल सांगत होता तो बारा वर्षांचा जखमी ब्रह्मा खानकरी. 

अशी घडली घटना

मंगळवारी (ता. 28) दुपारी मालेगाव-देवळा मार्गावर घडलेल्या भीषण अपघातातील हृदयद्रावक घटना सांगत असताना ब्रह्माचे डोळे पाणावले होते. ब्रह्मा आणि त्याची आई छाया विजय खानकरी (वय 40, रा. कजगाव, ता. भडगाव, जि. जळगाव) हे दोघे मायलेक धुळे-मालेगाव-देवळा बसमध्ये देवळ्याला येण्यासाठी बसले होते. गुरुवारी (ता. 30) ब्रह्माच्या आतेभावाचे लग्न होते. त्यासाठी अत्यंत आनंदामध्ये मायलेक कजगाववरून चाळीसगावमार्गे मालेगावला आले. देवळा येणाऱ्या बसमध्ये बसले. त्याच बसमध्ये आणखीही काही नातलग त्यांना भेटले. ब्रह्माच्या शेजारी एक अनोळखी 80 वर्षांचे आजोबा होते. आजोबांना तो लग्नात काय काय गमतीजमती करणार याबाबत आनंदाने सांगत होता. देवळा अवघ्या 15 मिनिटांवर होते. चालक भरधाव बस चालवीत असतानाच अचानक बस हेलकावे घेत, समोरून येणाऱ्या रिक्षाला धडकली. अवघ्या काही क्षणांत रिक्षासह बस रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. ब्रह्माच्या उजव्या डोळ्याभोवती मार लागल्याने तो काही क्षण भांबावला. त्यानंतर त्याला जेव्हा शुद्ध आली तेव्हा बसमध्ये पाणी भरलेले होते. त्याने सिटावर पाय देत उजेड येत असलेल्या बसच्या पाठीमागच्या खिडकीकडे धाव घेतली.

खिडकीची काच फोडून बाहेर येणारा तो पहिलाच

खिडकीची काच फोडून बाहेर येणारा तो पहिलाच. त्याला पाहून विहिरीच्या कठड्यावरच्या लोकांनी एकच गलका केला. पण, ब्रह्माची नजर त्याच्या आईला शोधत होती. त्याने पुन्हा खिडकीतून बसच्या आतमध्ये पाहिले तर, अर्धी अधिक बस पाण्यात होती. त्याला काहीच दिसत नव्हते. आईला हाक मारत तो पुन्हा बसमध्ये जाऊ पाहत असतानाच, दोघांनी त्याला रोखले. त्याला नाव-गाव विचारले. त्याने एकाकडे फोन मागितला आणि देवळ्याला लग्नासाठीच आलेल्या त्याच्या वडिलांना फोन केला व घटनेची माहिती दिली. 

Image may contain: 1 person, close-up
अर्धा तास मृत्यूचा विळखा 

बस विहिरीत कोसळताच ब्रह्माची आई छाया खानकरी यांच्या डोक्‍याला जबर मार लागला. त्यांच्या शेजारी बसलेल्या नातलग मीनाक्षी मुसळे यांनाही गंभीर मार लागला. छाया खानकरी यांना शुद्ध आली तेव्हा त्या छातीपर्यंतच्या पाण्यात होत्या. त्यांच्या पायाखाली कोणीतरी होते. डोक्‍यातून भळाभळा रक्त वाहत होते. बसमध्ये डिझेल, ऑइलचा वास भरला होता. आजूबाजूला काहीही त्यांना दिसत नव्हते. बाजूच्या सिटावरच्या महिला मृत्युमुखी पडलेल्या... पाण्यातील मृतदेहात त्यांचा पाय अडकलेला... साडीही सिटांमध्ये अडकल्याने त्यांना हालचाल करता येईना... ब्रह्माही त्यांच्या नजरेला दिसेना... अर्धाअधिक तास त्या त्याच स्थितीमध्ये होत्या. मिनिटा मिनिटाला पाणी वाढत होते. कंबरेला असलेले पाणी त्यांच्या छातीच्या वरपर्यंत आले होते. डोळ्यासमोर मृत्यू दिसत असतानाच, अचानक त्यांचे हात धरून कोणीतरी त्यांना वर खेचत असल्याचे जाणवले. अशाही स्थितीत "माझा पोरगा शोधा हो आधी!' अशी आर्त विनवणी त्या करीत होत्या. 

क्लिक करा > PHOTOS : काही समजण्याच्या आतच..तीस सेकंदात खेळ झाला...अन्‌..​

पुण्याई कामी आली 

कजगावात किराणा दुकान आहे. कधी कोणी अडलानडला आला आसल तर मागं धाडला नाही. हीच पुण्याई सून अन्‌ नातवाला कामी आली भाऊ... नातवाच्या लग्नाला मायलेक येत होते. -जगन्नाथ खानकरी, छाया यांचे सासरे 

नाशिकमध्ये दाखल; लग्नाच्या आनंदावर विरजण

ब्रह्मावर देवळ्यात प्राथमिक उपचार करण्यात आले, तर छाया खानकरी यांच्या डोक्‍याला आठ टाके घालण्यात आले आहेत. त्यांना नाशिकमध्ये अशोका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लग्नासाठी येताना त्यांच्याकडे काही रोकड व दागदागिने होते. मात्र, अपघातामध्ये ती पिशवीही गेली आहे.  
क्लिक करा > VIDEO : यमाची काळी सावली पोहोचली पण...आजी अन् नातीची व्यथा..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mother and son met after the accident nashik marathi news