PHOTOS : "आमदार-खासदार काय करतात?' "केंद्र सरकारचा निषेध.."शोले'स्टाइल" आंदोलन

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 8 February 2020

कांदा निर्यातीसंबंधी केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यात येत आहे. केंद्रातील भाजप सरकारला समर्थन असलेल्या खासदारांपुढे सरकार मान तुकवत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लासलगावमध्ये आंदोलन छेडावे लागले. यापुढील काळात सरकारची भूमिका ताठर राहिल्यास रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.

नाशिक : कर्नाटक-आंध्र प्रदेशातील सांबारसाठी वापरण्यात येणाऱ्या कांद्याच्या निर्यातीचा निर्णय घेतला जातोय पण खाण्याच्या कांद्याचे भाव ढासळत असतानाही त्याची निर्यातबंदी उठविली जात नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी रोष प्रकट केला. लासलगाव बाजार समितीच्या आवारातील टाकीवर चढून शुक्रवारी (ता. 7) कांदा उत्पादकांनी "शोले'स्टाइल आंदोलन केले. सरकारच्या विरोधात आणि निर्यातबंदी हटविण्याच्या घोषणा दिल्या. नांदूरशिंगोटे येथील उपबाजार आवारातील शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले. 

लासलगावमध्ये "शोले'स्टाइल आंदोलन 
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात तातडीने सुरू करावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा लासलगावमधील आंदोलनावेळी देण्यात आला. शेतकऱ्यांनी पाऊण तास टाकीवरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. "निर्यातबंदी उठवली पाहिजे', "कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे', "आमदार-खासदार काय करतात?', "केंद्र सरकारचा निषेध असो' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. सरकारचा सक्षम अधिकारी निवेदन घेण्यासाठी येत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर लासलगावचे पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांनी घटनास्थळी दाखल होत शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या. निफाडचे नायब तहसीलदार वाय. जे. शिंदे, ए. एल. पाटील, सुरेश निमकर यांना निवेदन देण्यात आले. प्रहार जनशक्ती संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष शंकर गायखे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाचे निफाड तालुकाध्यक्ष संजय साठे, प्रहार संघटनेचे चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, उद्धव न्याहारकर, अनंत भोसले, सागर पुरकर, हरी ठाकरे, महेश काळे, शिवाजी न्याहारकर, खंडू गांगुर्डे, निळुबा न्याहारकर, गणेश निंबाळकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Image may contain: one or more people, sky and outdoor

Image may contain: one or more people, people standing and crowd
भाव कोसळताच आंदोलन पेटले 
नांदूरशिंगोटे बाजार समिती उपआवारात सायंकाळी पाचच्या सुमारास लिलाव सुरू होताच, भाव कोसळले. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत लिलाब बंद पाडले. त्यामुळे इथे काही काळ तणावाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणा देत निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली. 
कांदा महिन्यापूर्वी दहा हजार रुपये क्विंटल भावाने विकला जात होता. आता दोन हजारांचा भाव मिळणे मुश्‍कील झाले आहे. शेतकऱ्यांना कमी भावाने कांदा विकणे परवडत नाही. अगोदर शेतकऱ्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे होणाऱ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून निर्यातबंदी हटवावी, अशी मागणी संतप्त शेतकरी करत होते. बाजारपेठेत आवक वाढल्याने भावात घसरण होत असून, ती न थांबल्यास रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल, लिलाव सुरू होणार देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी स्वीकारली. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना दीपक बर्के यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन दिले. माजी उपसरपंच भारत दराडे, हरिभाऊ मुंगसे, गणपत केदार, संजय शेळके, शशिकांत येरेकर, गणेश शेळके, सोमनाथ शेळके यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर कांदा लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी (ता. 7) जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये क्विंटलभर कांद्याला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा ः येवला- एक हजार 550, लासलगाव- एक हजार 701, मुंगसे- एक हजार 550, चांदवड- एक हजार 700, मनमाड- एक हजार 600, देवळा- एक हजार 750, नाशिक- एक हजार 700, पिंपळगाव- एक हजार 701. 

Image may contain: one or more people, people walking, crowd and outdoor

सलग दुसऱ्या दिवशी रोष प्रकट; रस्त्यावर उतरण्याचा इशारा  
कृष्णापुरम कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली, मग महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांनी सरकारचे काय घोडे मारले? सरकारने तत्काळ निर्यात खुली करावी, अन्यथा राज्यात मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल. येत्या सोमवारी (ता. 10) सकाळी अकराला नाशिकला विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. -भारत दिघोळे, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघ 
 

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​

केंद्राने तातडीने महाराष्ट्रात निर्यात खुली करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कांद्याला किमान दोन हजार रुपये हमीभाव मिळावा. त्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये. -केदारनाथ नवले, कांदा उत्पादक, सोमठाणदेश 

कांदा निर्यातीसंबंधी केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यात येत आहे. केंद्रातील भाजप सरकारला समर्थन असलेल्या खासदारांपुढे सरकार मान तुकवत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लासलगावमध्ये आंदोलन छेडावे लागले. यापुढील काळात सरकारची भूमिका ताठर राहिल्यास रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे. -निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक, वाहेगाव साळ 

हेही वाचा > PHOTOS : बहिण-भावाची भेट होण्यापूर्वीच मोठा आक्रोश... ह्रदय पिळवटून टाकणारी घटना.
... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movement against onion export ban Nashik Marathi News