''मराठा आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा'' - छगन भुजबळ

1234.jpg
1234.jpg

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, नुकताच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. त्यामुळे ही लढाई आता पूर्णपणे न्यायालयीन झाली आहे. तसेच, मी जरी ओबीसी नेता असलो, तरी मराठा आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठिंबा असून, माझा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्य सरकारचा मराठा आरक्षणास १०० टक्के पाठिंबा आहे. राज्य सरकारतर्फे न्यायालयात हा लढा पूर्ण ताकदीने लढला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

समाजात द्वेष पसरविण्याचे काम होत आहे...

श्री. भुजबळ म्हणाले, की दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या प्रश्‍नावर शरद पवार यांच्यासमवेत दिल्लीतील बैठकीला मी जात असल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे समन्वयकांना कळविले होते. तसेच हा दौरा अचानकपणे रद्द झाल्याने पुन्हा मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना नियोजित सार्वजनिक कार्यक्रमांनुसार चर्चा करून सकाळी साडेदहाला, दुपारी दीडची भेटण्याची वेळ दिली होती. तसेच मोर्चेकऱ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, भेटण्यासाठी कार्यालयात पोचण्याच्या आधीच मोर्चा समन्वयकांनी माझ्या विरोधात प्रक्षोभक भाषणे व घोषणाबाजी करत तिथून काढता पाय घेतला. समन्वयकांना भेटायला वेळ दिलेली असताना समाजात द्वेष पसरविण्याचे काम केले. याचे तीव्र दु:ख होत आहे. 

केंद्राच्या हस्तक्षेपाची गरज 

सर्व प्रकार घडल्यानंतरही आपण मराठा मोर्चा समन्वयकांना भेटण्यासाठी तयार आहोत, असे कळविले होते. त्यानुसार आज भेटण्यासाठी आल्याबद्दल मी आभारी असल्याचे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की कुठलाही मोर्चा काढताना त्या मोर्चाचे नेतृत्व करण्याची कुणा एका नेत्याची जबाबदारी असते. त्यामुळे हा मोर्चा पार पडताना चुकीच्या प्रकाराबद्दल मोर्चेकऱ्यांना समजाविण्याची कुठल्या तरी नेत्याची जबाबदारी होती, ती पार पाडली गेली नाही. केंद्र सरकारने आपले आरक्षण ५० टक्क्यांहून ६० टक्क्यांवर नेत आरक्षणात दहा टक्के वाढ केली. त्यावेळी मात्र स्थगिती मिळाली नाही. मात्र, महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण दिल्यानंतर आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज होती. 

पालकमंत्र्यांबद्दल नाही आकस 

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी मराठा क्रांती मोर्चाच्या मनात कुठलाही आकस नाही. शुक्रवारी (ता. १८) घडलेला प्रकार असमन्वयातून झालेल्या गैरसमजाचा परिणाम असला, तरी दुर्दैवी होता. त्याची जाणीव झाली आहे. जिल्ह्याचे पालक म्हणून आमच्या भावना समजून घ्याव्यात, असे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी स्पष्ट केले. तसेच, ज्येष्ठ नेते सुनील बागूल यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासात छगन भुजबळ यांचे योगदान मोठे असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली.  

मराठा मोर्चा समन्वयकांवरील गुन्हे मागे घेणे, सारथी पूर्ण क्षमतेने सुरू करणे, मराठा मुलींसाठी वसतिगृह या सर्व मागण्या आपण सरकारदरबारी मांडून त्या पूर्ण करू, असे आश्‍वासनही श्री. भुजबळ यांनी दिले. मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी भुजबळ फार्म येथे भेट घेतली असता, श्री. भुजबळ बोलत होते. माजी खासदार समीर भुजबळ, देवीदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, नाना महाले, सुनील बागूल, निवृत्ती अरिंगळे, रंजन ठाकरे, नगरसेविका वत्सलताई खैरे, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, शरद तुंगार, शिवा तेलंग, बंटी भागवत, आशिष हिरे, चेतन शेलार, शिवाजी मोरे, संदीप शितोळे, बाळा निगळ, नीलेश शेलार, नीलेश मोरे, किरण पानकर, योगेश गांगुर्डे यांच्यासह मराठा मोर्चा समन्वयक उपस्थित होते.

संपादन - किशोरी वाघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com