नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती तीन दिवस बंद...भाजी व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह..

nashik bazar.jpg
nashik bazar.jpg

नाशिक / म्हसरूळ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी आढळलेल्या व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने बाजार समिती तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे दोन दिवसांत आणखी दोन रुग्ण आढळल्याने संचालक मंडळाने कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
बाजार समितीतील सर्वच प्रकारचे व्यवहार मंगळवारी (ता. २६) ते गुरुवारी (ता. २८) मे २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. 

व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर आणखी दोन रुग्ण

लॉकडाऊनच्या काळातही नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू होती. त्यामुळे संचालक मंडळाच्या वतीने समितीत होणारी गर्दी टाळण्याचे प्रयत्न करण्यात आले. किरकोळ विक्री बंद करण्यात आली. तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यासाठी नियम करण्यात आले होते. मात्र, येथील गर्दीवर नियंत्रण आणणे मुश्किल होत होते. येणाऱ्या शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची वाहने तसेच बाजारात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी सॅनिटायझर टनेल बसविण्यात आलेले होते. गेली दोन महिने कोरोनाचा शिरकाव रोखण्यास बाजार समितीला यश आले होते.

शेतकऱ्यांना अन् हमालांनाही बाधा होण्याची शक्यता
नाशिक बाजार समितीत सध्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येत आहेत. मुंबई आणि उपनगरीय परिसरातील कोरोनाबाधित क्षेत्रातून अनाधिकृतपणे खरेदीदारांची बाजार समितीत ये-जा सुरू आहे. मात्र अशातच पेठरोडवर कोरोनाबाधित रुग्ण आढळला. मात्र काल रात्री तो मृत झाला. त्यापाठोपाठ दिंडोरी रोड येथील हॉटेल व्यावसायिक आणि क्रांतीनगरमधील भाजी व्यावसायिक युवक असे दोन रुग्ण पुन्हा आढळले. या दोन्ही रुग्णांचा बाजार समितीशी संबंध आलेला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांना आणि हमालांनाही त्याची बाधा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाबरोबरच पंचवटीतील फुलेनगर, पेठरोड, नवनाथनगर, क्रांतीनगर आदी भागातही करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बाजार समितीच्या आवाराचे निर्जंतुकीकरण करणे गरजेचे झाले आहे. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी किमान तीन दिवस बाजार बंद ठेवणे गरजेचे आहे, अशा मागण्यांचे पत्र हमाल-मापारी प्रतिनिधी संचालक चंद्रकांत निकम व व्यापारी प्रतिनिधी जगदीश अपसुंदे यांनी बाजार समितीला दिले. त्यानंतर सभापती सकाळे यांनी बाजार समिती तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

नऊ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल ठप्प

बाजार समितीत नाशिक शहरासह जिल्हाभरातून पालेभाज्या ,फळभाज्या कांदा बटाटा व फळे विक्रीसाठी येत असतात. सर्वसाधारणपणे बाजार समितीची रोजची उलाढाल सव्वा कोटीच्या आसपास होत असते. त्यानुसार बाजार समिती तीन दिवस बंदमुळे जवळपास नऊ ते दहा कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

दिंडोरी रोड आवार व पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्ड हे तीन दिवस बंद ठेवण्यात आले असून, कृपया शेतकरी वर्गाने पालेभाज्या व फळभाज्या घेऊन येऊ नये. शेतकरी, हमाल, मापारी आणि व्यापारी वर्गाने बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन सचिव अरुण काळे यांनी केले आहे.

दोन्ही मार्केट बंद
बाजार समितीत आढळलेल्या 'त्या' रुग्णाचे मुंबईत येणे जाणे होते. बाजार समितीत शेतकरी वर्गाची वर्दळही जास्त असते. त्या कारणास्तव येत्या तीन दिवस दिंडोरी रोड आणि पेठरोड येथील दोन्ही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. (दि. २६) ते (दि. २८) मे या काळात बाजार समितीच्या आवाराची साफसफाई करून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.- संपतराव सकाळे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com