नाशिककरांसाठी आनंदवार्ता! शहरात कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर

विक्रांत मते
Saturday, 26 September 2020

जूनमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२.६० टक्के होते. जुलैत तेच प्रमाण ७१ टक्क्यांपर्यंत पोचले. ऑगस्टमध्ये ८४ टक्क्यांवर रिकव्हरी रेट पोचला. सर्वाधिक रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळले. तरी २४ सप्टेंबरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांपर्यंत पोचले.

नाशिक : शहरातील करोनाबाधितांच्या नव्याने आलेल्या आकडेवारीनुसार रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांवरून ९१.०५ टक्क्यांपर्यंत पोचल्याने संसर्गाच्या चिंताजनक परिस्थितीत ही बाब महत्त्वाची मानली जात आहे. कोरोनाबाधित बरे होण्यामध्ये नाशिक राज्यात आघाडीवरचे शहर बनले असून, राज्यात सध्या रेट ७५.०९ टक्के एवढा आहे. 

चाचण्यांची संख्या वाढविल्याचा परिणाम 

मेअखेरपासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढताना दिसत आहे. मेअखेर २३७ कोरोनाबाधित होते. २५ सप्टेंबरअखेर रुग्णांनी ४७ हजारांचा टप्पा पार केला. ६७९ नागरिक मृत झाले आहेत. वाढत्या कोरोनाबाधितांमुळे महापालिकेने एका पॉझिटिव्ह रुग्णामागे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगद्वारे ३५ नागरिकांची तपासणी सुरू केली. महापालिकेने चार कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या रॅपिड टेस्टद्वारेही तपासण्या वाढविल्या. त्याचबरोबर कोमॉर्बिड रुग्णांचे सर्वेक्षण सुरू केले. त्यातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. जूनमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४२.६० टक्के होते. जुलैत तेच प्रमाण ७१ टक्क्यांपर्यंत पोचले. ऑगस्टमध्ये ८४ टक्क्यांवर रिकव्हरी रेट पोचला. सर्वाधिक रुग्ण सप्टेंबरमध्ये आढळले. तरी २४ सप्टेंबरपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८ टक्क्यांपर्यंत पोचले. २५ सप्टेंबरला हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात नाशिक शहराचा रिकव्हरी रेट सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. 

राज्यात नाशिक आघाडीवर 

९१ टक्क्यांपर्यंत रिकव्हरी रेट पोचल्याने नाशिक राज्यात आघाडीवर पोचले आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ७५.०९ टक्के आहे. नाशिक ग्रामीणमध्ये ८०.५१ टक्के, मालेगाव महापालिका हद्दीत ८०.४२ टक्के रिकव्हरी रेट आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

शहरात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून, त्या अनुषंगाने ट्रेसिंग केले जात आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यास उपचार केले जात असल्याने रिकव्हरी रेट वाढला. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. - कैलास जाधव, आयुक्त, महापलिका  

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik city corona patient recovery rate has increased nashik marathi news