कोरोनाची अफवा पसल्याने घटले टोमॅटोचे क्षेत्र; जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक कोंडीत

प्रमोद पाटील
Wednesday, 12 August 2020

कोरोनामुळे सुरवातीला अफवा पसरल्याने यंदा नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो लागवडीचे क्षेत्र सात हजार हेक्टरने घटले आहे. यंदा १३ हजार हेक्टरवर टोमॅटो पीक घेण्यात आले आहे.

नाशिक/ चिचोंडी : लॉकडाउनमुळे यंदा नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो लागवडीचे क्षेत्र सात हजार हेक्टरने घटले आहे. जिल्ह्यात दर वर्षी साधारणतः २० हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड होते. मात्र, कोरोनामुळे सुरवातीला अफवा पसरल्याने त्याचा परिणाम टोमॅटो लागवडीवर झाला. यंदा १३ हजार हेक्टरवर टोमॅटो पीक घेण्यात आले आहे.

लागवडीत ५० टक्के घट

मजूर, साहित्यादरात झालेली २० टक्के वाढ, लोकडाउनमुळे बाहेरील व्यापाऱ्यांनी फिरवलेली पाठ यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. जिल्ह्यात दर वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीचा पहिला आणि नागपंचमीच्या दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यात टोमॅटोची लागवड होते. मात्र, या वर्षी बेभरवशाचा भाव, लॉकडाउनमुळे मेच्या शेवटच्या आठवड्यात व नागपंचमी या दोन्ही वेळच्या लागवडीत ५० टक्के घट झाली. जिल्ह्यात नाशिक, चांदवड, निफाड, सिन्नर, येवला, सटाणा, दिंडोरी तालुक्यांत टोमॅटोची लागवड होते.

शेतकरी आर्थिक कोंडीत

हवामान बदल, मजूर, साहित्यदरात वाढ या सर्वांमुळे टोमॅटोच्या काढणीपर्यंतच्या खर्चात या वर्षी २५ टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत टोमॅटोची मुख्य बाजारपेठ आहे. या मार्केटमध्ये टोमॅटोची आवक निम्म्याने घटली आहे. रोज केवळ दहा हजार टोमॅटो क्रेट्सची आवक पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये होत आहे.

जिल्ह्यात टोमॅटो लागवड (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र
नाशिक- एक हजार ७६८
निफाड- दोन हजार ६००
सिन्नर- ७६९
येवला- १८८
चांदवड- दोन हजार ६५०
सटाणा- ६५०
दिंडोरी- तीन हजार ६६८

कोरोनाचा टोमॅटोवर हल्ला, अशा बातम्या सोशल मीडियावर पसल्याने याचा या वर्षी टोमॅटोच्या लागवडीवर मोठा परिणाम झाला. लॉकडाउनमुळे बाहेरील व्यापारी आलेले नाही. आवक कमी असून, योग्य भाव मिळत आहे. मात्र, खर्चात वाढ झाली आहे.
दत्तू आवारे, शेतकरी पन्हाळे

माल चांगला असल्याने मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, बिहार, बांगलादेश येथे जात आहे. आवक कमी मात्र दर्जेदार माल येत असल्याने बाहेर माल जात आहे.
अनिल पगारे, साईबाबा व्हेजिटेबल, पिंपळगाव बसवंत

बुरशीनाशक, कीडनाशक औषध फवारणीमुळे खर्च वाढला आहे. या वर्षी वातावरणातील बदलामुळे झांतो बुरशी अटॅक वाढला आहे. दव पडल्यानंतर हा वाढत असल्याने खर्चात वाढत झाली आहे.
किरण लभडे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, निमगाव मढ

संपादन : रमेश चौधरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik district the area of tomatoes has decreased by seven thousand hectares