नाशिककरांवर यंदा पाणीटंचाईचे संकेत! अतिरिक्त ३०० दशलक्ष घनफूट पाणी उचलण्याची सक्ती 

विक्रांत मते
Thursday, 21 January 2021

धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही मुंबईसह नगर, मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या नाशिककरांवर यंदा पाणीटंचाई कोसळण्याचे संकेत मिळत आहेत.

नाशिक : धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असूनही मुंबईसह नगर, मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या नाशिककरांवर यंदा पाणीटंचाई कोसळण्याचे संकेत मिळत आहेत.

ज्या दारणा धरणातून अळीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नाशिक रोडच्या नगरसेवकांनी महासभेत राडा केला त्याच धरणातून अतिरिक्त तीनशे दशलक्ष घनफूट पाणी उचलण्याची सक्ती जलसंपदा विभागाकडून केली जात असल्याने हे संकट कोसळणार आहे. दारणात अतिरिक्त तीनशे दशलक्ष घनफुटांचे आरक्षण टाकताना मुकणे धरणातील तेवढेच पाणी गोदावरी एक्स्प्रेस कालव्यातून मराठवाड्याला सोडण्याची तयारी करण्यात आली आहे. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची तयारी

यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणांमध्ये मुबलक साठा आहे. विशेष म्हणजे मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरणदेखील फुल्ल झाल्याने नाशिकमधून पाण्याची मागणी होण्याची शक्यता कमीच होती; परंतु जलसंपदा खात्यात व गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रमुख पदांवर बसलेल्या मराठवाड्यातील अधिकाऱ्यांकडून जायकवाडीसाठी नाशिकमधून पाणी सोडण्याची तयारी चालविली जात आहे. नाशिक शहरासाठी यंदा गंगापूर धरणातून तीन हजार ८०० दशलक्ष घनफूट, दारणा धरणातून चारशे दशलक्ष घनफूट, तर मुकणे धरणातून एक हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले आहे; परंतु मुकणे धरणातील एक हजार ३०० पैकी तीनशे दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी एक्स्प्रेस कालव्याद्वारे मराठवाड्यात वळविण्याची गरज व्यक्त केली जात असल्याने त्यातून पाण्याचे संकट ओढावताना दिसत आहे. शहरासाठी आरक्षण जाहीर केले असले तरी लिखित स्वरूपात आदेश काढले न गेल्याने त्याचा लाभ उठवत पाणी वळविण्याचे नियोजन केले जात आहे. मुकणे धरणातून वजावट केलेले तीनशे दशलक्ष घनफुटांचे आरक्षण दारणा धरणात टाकण्याचे नियोजन केले जात आहे. 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क
 

अळीयुक्त पाणी माथी मारण्याचे प्रयत्न 

शहरासाठी दारणा धरणात चारशे दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण टाकले जात असले तरी प्रत्यक्षात अळीयुक्त व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने महापालिका ते पाणी उचलत नाही. दोन दिवसांपूर्वी प्रदूषित पाण्यावरून शिवसेनेच्या नगरसेवकांनी महासभेत राडा केला होता. त्यामुळे गंगापूर धरणातून अतिरिक्त चार दशलक्ष लिटर पाणी सोडण्याचा निर्णय महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिला आहे. आता मुकणेच्या पाण्यात कपात करून ते पाणी दारणा धरणातून उचलण्याची सक्ती केली जाणार असल्याने अळीयुक्त पाणी नाशिककरांच्या माथी मारण्याचे प्रयत्न होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मुकणेच्या आरक्षित पाण्यात कपात झाल्यास इंदिरानगर, नाशिक रोड, पूर्व विभागातील काही भागात उन्हाळ्यात टंचाई निर्माण होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik residents are likely to face water scarcity Marathi news