नागपूरच्या धर्तीवर नाशिकलाही पाणी पुनर्वापराचे पैसे मिळावे; महापालिकेची शासनाकडे मागणी 

nashik municipal corporation
nashik municipal corporation

नाशिक : नागपूर महापालिकेला पाणी पुनर्वापराचे पंधरा कोटी रुपये मिळत असल्याच्या धर्तीवर नाशिक महापालिकेलादेखील वीस कोटी रुपये मिळाले पाहिजे, अशी भूमिका महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागपूर महापालिकेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केली. शासनाने महापालिकांमध्ये भेदभाव न करता नागपूरप्रमाणेच नाशिकला न्याय द्यावा, अशी मागणी शासनाकडे केली जाणार आहे. 

नागपूर महापालिकेला जलसंपदा विभागाकडून पाणीपुरवठा करताना पुनर्वापराचे पाणी नदीत सोडल्यानंतर ते पाणी वीज वितरण कंपनी उचलते. ते पाणी पुढे मिहान प्रकल्पासाठी महाजनकोमार्फत दिले जाते. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्यापोटी नागपूर महापालिकेला पंधरा कोटी रुपये अदा केले जाते. नाशिकमध्ये उलट परिस्थिती असून, जलसंपदा विभागाकडून वारंवार पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा मोबदला मागितला जातो. नाशिक महापालिकेकडूनही पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते पाणी गोदापात्रात सोडले जाते. पुढे हे पाणी इंडियाबुल्स कंपनी उचलते. परंतु मोबदला मात्र जलसंपदा विभागाला अदा केला जात असल्याची बाब महापौर कुलकर्णी यांनी निदर्शनास आणली. त्यामुळे जलसंपदा विभागासोबत करार करताना नागपूर महापालिकेने वीज वितरण कंपनीशी केलेल्या करारनाम्याची माहिती घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार नागपूर महापालिकेचा करार नाशिक महापालिकेला प्राप्त झाला असून, त्यात नागपूरला पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्यापोटी पंधरा कोटी रुपये प्राप्त होत असल्याचे नमूद करण्यात आल्याने त्याच धर्तीवर नाशिक महापालिका शासनाकडे मागणी करणार आहे. 

नागपूर महापालिकेप्रमाणेच नाशिक महापालिकेलादेखील पाणी पुनर्वापराचा खर्च मिळाला पाहिजे, अशी मागणी शासनाकडे केली जाणार असून, महापालिकांमध्ये भेदभाव होणार नाही, ही अपेक्षा आहे. 
-सतीश कुलकर्णी, महापौर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com