Republic Day 2020 : नाशिकच्या पाच सहाय्यक पोलिसांना "राष्ट्रपतिपदक"

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 January 2020

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील मेहबूबअली जियाद्दिन सय्यद, गुप्तवार्ता विभागातील बाबूराव दौलत बिऱ्हाडे, विभाग दोनमधील संजय वायचळे, नाशिक ग्रामीण विभागातील विष्णू गोसावी आणि राज्य गुप्तवार्ता विभागातील आणखी एक अशा पाच जणांचा समावेश आहे. याशिवाय केंद्रीय गृह विभागाने देशातील गुप्तवार्ता विभागातील अधिकाऱ्यांना पदक जाहीर केले आहे. त्यात, महाराष्ट्र (एसपीजी) विभागातील नाशिकचे सूर्यकांत फोकणे हे एकमेव अधिकारी आहेत.

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (ता. 25) जाहीर झालेल्या राष्ट्रपतिपदक विजेत्यांमध्ये नाशिकच्या पाच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. 

हे आहेत पाच पोलीस...

त्यात नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातील मेहबूबअली जियाद्दिन सय्यद, गुप्तवार्ता विभागातील बाबूराव दौलत बिऱ्हाडे, विभाग दोनमधील संजय वायचळे, नाशिक ग्रामीण विभागातील विष्णू गोसावी आणि राज्य गुप्तवार्ता विभागातील आणखी एक अशा पाच जणांचा समावेश आहे. याशिवाय केंद्रीय गृह विभागाने देशातील गुप्तवार्ता विभागातील अधिकाऱ्यांना पदक जाहीर केले आहे. त्यात, महाराष्ट्र (एसपीजी) विभागातील नाशिकचे सूर्यकांत फोकणे हे एकमेव अधिकारी आहेत. 

Image may contain: 1 person

मेहबूबअली जियाद्दिन सय्यद

नाशिक पोलिस गुप्तवार्ता युनीटमधील बिऱ्हाडे यांची 1985 मध्ये मालेगावला नियुक्ती झाली. नाशिक रोड, भद्रकाली, गुन्हे शोध विभाग, सातपूर, अंबड, परिमंडळ दोन, सायबर विभागात त्यांनी काम केले. 1991 मध्ये घाटकोपर येथील दंगलीनंतर शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गोपनीय माहिती संकलन, भद्रकाली पोलिस ठाण्यात दरोडेखोरांना जेरबंद करणे आदी महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावल्या आहेत. पंचवटीतील खून प्रकरणातील फरारी गुन्हेगार शोधण्याची कामगिरीही त्यांनी केली. त्यांना 2017 मध्ये पोलिस महासंचालकांचे पदक मिळाले आहे. 35 वर्षांच्या सेवेत त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले असून, 400 पदकं मिळविली आहेत. 

Image may contain: 1 person

बाबूराव दौलत बिऱ्हाडे

राष्ट्रपतिपदक विजेते वायचळे नाशिक शहरातील रहिवासी असून, परिमंडळ दोनमध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी सातपूर, नाशिक रोड, अंबड, भद्रकाली अशा विविध पोलिस ठाण्यांत त्यांनी काम केले आहे. पोलिसांच्या तपास प्रक्रियेतील कौशल्य विकासासाठी वेळोवेळी होणारे विशेष प्रशिक्षण, सायबर प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांत त्यांचा सहभाग राहिला आहे. अंबडला त्यांनी खुनाचे गुन्हे उघडकीस आणले. कायदा सुव्यवस्था, गुंतागुंतीच्या तपासात त्यांचा सहभाग राहिला आहे. आतापर्यंत त्यांना 280 पुरस्कार (रिवार्ड) मिळाले आहेत. 

Image may contain: 1 person, sunglasses

विष्णू गोसावी

भगूर येथील रहिवासी विष्णू गोसावी ग्रामीण पोलिस दलात विदेशी नागरिक व पारपत्र विभागात कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांनी आझादनगर (मालेगाव), पारपत्र, विदेशी नागरिक व्यवहार, दहशतवादविरोधी पथक, विशेष शाखा, ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्ष आदी विभागांत काम केले आहे. 2015 ला विदेशी नागरिकांचे अवैध वास्तव्य शोधून हद्दपारीच्या कामगिरीबद्दल त्यांना पोलिस पदक मिळाले आहे. 

Image may contain: 1 person

संजय वायचळे

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असून, 1988 पासून पोलिस दलात आहेत. आतापर्यंत त्यांनी पंचवटी, सरकारवाडा, भद्रकाली, गुन्हे शाखा, देवळाली कॅम्प, विशेष सुरक्षा विभागात कर्तव्य बजावले आहे. गुन्हे शाखेत असताना 58 चोऱ्या, 29 घरफोड्या आणि दोन खुनाचे गुन्हे उघडकीस आणले. आनंदवलीतील आनंदीबाईच्या गढीवर सुरक्षारक्षकांनी स्थानिकांच्या वावराला प्रतिबंध करताना गोळीबार केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, तर 25 जण जखमी झाले होते. या घटनेत सय्यद यांनी सातपूर येथील पेरूच्या बागेपर्यंत पाठलाग करीत, सुरक्षा रक्षकांना लोडेड बंदुकीसह ताब्यात घेतले होते. त्यांना आतापर्यंत खात्यांतर्गत 353 रिवॉर्ड मिळाले असून, 2004 ला पोलिस महासंचालकांचे पदक मिळाले आहे. 

दरम्यान, राज्य गुप्तवार्ताचे फोकणे यांनाही गोपनीय शाखेतील कामगिरीबद्दल उत्कृष्ट सेवेचे पदक मिळाले आहे. राज्यातील गुप्तवार्ता विभागाचे ते नाशिकचे एकमेव अधिकारी आहेत. पंचवीस वर्षांपासून ते पोलिस दलात असून, गोपनीय शाखेत कार्यरत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik,s Five Police got Presidential Medal Marathi News