"नवनीत राणा बाईंचा कंगनासाठी जीव तुटतोय.. पण महाराष्ट्रातून निवडून गेल्याचा विसर पडलाय का?" कोण म्हणाले वाचा

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 16 September 2020

तुमच्या सहकारी कंगना यांना महाराष्ट्र संस्कृती काय असते, हे समजून सांगा. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे जे षडयंत्र सुरु केले आहे, ते वेळीच थांबवा.आम्ही जिजाऊ, सावित्रीच्या लेकी आहोत. उत्तर आम्हालाही देता येते. उगाच कंगनासाठी आम्हाला डिवचू नका.

नाशिक : खासदार नवनीत राणा या कंगणा राणावत आणि मदन शर्मा यांना महाराष्ट्र सरकारकडून अन्यायकारक वागणूक देत आहे, अशा वल्गना दिल्लीत बसून करीत आहेत. खासदार राणा, आपण महाराष्ट्रातून निवडून गेला आहात हे लक्षात असू द्या. असे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या नाशिकच्या अध्यक्षा अनिता भामरे यांनी म्हटले आहे. 

राणांचा कंगनासाठी जीव तुटताना दिसतोय..पण..

तुमच्या सहकारी कंगना यांना महाराष्ट्र संस्कृती काय असते, हे समजून सांगा. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे जे षडयंत्र सुरु केले आहे, ते वेळीच थांबवा.आम्ही जिजाऊ, सावित्रीच्या लेकी आहोत. उत्तर आम्हालाही देता येते. उगाच कंगनासाठी आम्हाला डिवचू नका. पुर्वाश्रमीच्या अभिनेत्री म्हणून खासदार नवनीत राणा यांचा कंगनासाठी जीव तुटताना दिसतोय. नवी दिल्लीत बसून कंगना व मर्चंट नेव्हीचे निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांच्याविषयी खुपच कळकळ करतांना दिसतात. मात्र राणा महाराष्टातून निवडून गेलेल्या आहात, याचा विसर पडू देऊ नका, असे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या नाशिकच्या अध्यक्षा अनिता भामरे यांनी म्हटले आहे. 

ज्या ताटात खातो, त्या ताटात निदान हात धुऊ नये
यासंदर्भात भामरे यांनी सोशल मिडीयावर नवनीत राणा यांना पत्र लिहिले आहे. त्या म्हणाल्या, अभिनेत्री कंगणा राणावत, मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनी महाराष्ट्र विरोधात केलेल्या वक्तव्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याचे षडयंत्र चालवले जात आहे, हे सिध्द होत आहे. ते जनतेच्या निदर्शनास आले आहे. तेव्हा महाराष्ट्रातील विरोधक व लोकप्रतिनिधींना विनंती आहे, की आपण ज्या ताटात खातो, त्या ताटात निदान हात धुऊ नये हा प्रचलित प्रघात पाळावा. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

अन्यथा देशात अराजकता माजेल.
पत्रात म्हटले आहे, की गेल्या दोन दिवसांपासून अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा या कंगणा राणावत आणि मदन शर्मा यांना महाराष्ट्र सरकारकडून अन्यायकारक वागणूक देत आहे, अशा वल्गना दिल्लीत बसून करीत आहेत. खासदार राणा, आपण महाराष्ट्रातून निवडून गेला आहात हे लक्षात असू द्या. आपण भाजप सरकारला पाठींबा दिला आहे, हे देखील आम्हाला ज्ञात आहे. परंतू महाराष्ट्रात अनेक ज्वलंत प्रश्न असतांना नाहक वेगळा विषय काढून वाद पेटवतांना दिसत आहात. आपण पूर्वाश्रमीच्या अभिनेत्री असल्याने साहजिकच कंगणा राणावत विषयी आपला जीव तुटत असेल. आपण कंगणाच्या एक सहकारी म्हणून, कंगणाने महाराष्ट्राची संस्कृती अवगत करावी. निवृत्त झालेले शर्मा हे व्यंगचित्रकार आहेत, हे अगदी परवाकडेच समजले. भारतीय राज्य घटनेनुसार देशातील प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. परंतु त्याचा गैरवापर नको. अन्यथा देशात अराजकता माजेल. तेव्हा शासन स्तरावर काही बंधने गरजेची असतात. किंबहूना सगळ्यांनी त्याचे पालन करणे अभिप्रेत असते. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

महाराष्ट्रातील खासदार म्हणून राज्य सरकारच्या पाठिशी रहाणे अपेक्षित
अरे हो, आपण म्हणालात, कि राज्याचे मुख्यमंत्री उत्तर देत नाही. ते गप्प बसतात. याअर्थी त्यांचे मदन शर्मा मारहाणीला समर्थन दिसते. तसे अजिबात नाही. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शांत तसेच मृदू स्वभावाचे आहेत. परंतू त्यांच्या कामाची पध्दत वेगळी आहे. तसे म्हणाल पंतप्रधान ही अनेक प्रश्नांची उत्तरे देत नाही. महाराष्ट्रात कोरोना रोगाने थैमान घातले आहे, असे असतांना केंद्राची सापत्न वागणूक असून देखील राज्य सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. अशा वेळी आपण महाराष्ट्रातील खासदार म्हणून राज्य सरकारच्या पाठिशी रहाणे अपेक्षित होते. यापुढील काळात तरी महाराष्ट्राची बदनामी नको. आपल्या मतदार संघात अनेक प्रश्न आहेत, तेव्हा केद्रांत आपले वजन वापरून त्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, तेच बरे. 

आम्हाला पक्षाचा आदेश असल्याने आम्ही शांत आहोत.
सध्या एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी विरोधक महिला वर्गाचा वापर करतांना दिसतात. लक्षात ठेवा प्रत्येक पक्षात महिला आहेत. आम्हाला पक्षाचा आदेश असल्याने आम्ही शांत आहोत. अन्यथा आई जिजाऊ, सावित्रीबाई, रमाईच्या लेकिंना अन्यायाच्या विरोधात कसे लढायचे याचे ज्ञान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. त्यामुळे नागरिकांना, महिलांना घाबरण्याचे कारण नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navneet rana forgotten elected from Maharashtra said by NCP Nashik President nashik marathi news