BREAKING : एनडीएसटीचे चेअरमन बनकर यांना अटक..फोनचे संभाषण तपास पथकाच्या हाती 

बुधवार, 1 जुलै 2020

गेल्या महिन्यात सोसायटीचे शाखा व्यवस्थापक व व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाच्या रकमेपोटी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. याचप्रकरणी महत्त्वाचे पुरावे "लाचलुचपत'च्या हाती लागल्याने चेअरमन बनकर यांना अटक झाली आहे.

पैसे मागितल्याचे पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती 

नाशिक : जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेली नाशिक डिस्ट्रिक्‍ट सेंकेंडरी टिचर्स ऍण्ड नॉन टिचिंग एम्पॉई को-ऑप. सोसायटीचे चेअरमन रामराव बनकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता.1) अटक केली. गेल्या महिन्यात सोसायटीचे शाखा व्यवस्थापक व व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतनाच्या रकमेपोटी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. याचप्रकरणी महत्त्वाचे पुरावे "लाचलुचपत'च्या हाती लागल्याने चेअरमन बनकर यांना अटक झाली आहे. दरम्यान, लाचलुचपतच्या या कारवाईमुळे जिल्हा निबंधक कार्यालय सोसायटीच्या संचालकांविरोधात कोणती भूमिका घेते याकडे आता लक्ष लागून आहे. 

फोनचे संभाषण तपास पथकाच्या हाती
नाशिक डिस्ट्रिक्‍ट सेंकेंडरी टिचर्स ऍण्ड नॉन टिचिंग एम्पॉई को-ऑप. सोसायटीतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम व वेतन देण्यासंदर्भात संचालक मंडळाच्याच सांगण्यावरून शाखा व्यवस्थापक शरद जाधव, व्यवस्थापक जयप्रकाश कुवर यांनी 50 टक्के रकमेची मागणी केली होती. त्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, गेल्या 10 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना सोसायटीमध्येच अटक केली होती. 

अनेक गैरप्रकारांचा पर्दाफाश होण्याची शक्‍यता
याचप्रकरणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपास सुरू असताना, सोसायटीचे चेअरमन रामराव बनकर यांच्याकडील फोनवरून संभाषण तपास पथकाच्या हाती लागले आहे. त्यावरून चेअरमन बनकर यांचाही लाचप्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार लाचलुचपतचे पोलिस निरीक्षक हेमंत भामरे यांच्या पथकाने चेअरमन बनकर यांना अटक केली आहे. त्यामुळे या लाचलुचपत प्रकरणाचे धागेदारे आता सोसायटीच्या संचालकांपर्यंत पोहोचण्याची, तसेच चेअरमनच्या अटकेमुळे अनेक गैरप्रकारांचा पर्दाफाश होण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

सोसायटीच्या सभासदांमध्ये आनंदाचे उधाण 
दरम्यान, सोसायटीतील लाचप्रकरण उघडकीस आल्यापासून काही सभासदांनी जिल्हा निंबधक कार्यालयाकडे पाठपुरावा करीत सोसायटीतील गैरव्यवहाराप्रकरणी निवेदन देत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच संचालकांची चौकशी करून कारवाईचीही मागणी केली. परंतु निबंधक कार्यालयाकडून अद्यापपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. मात्र लाचलुचपतने चेअरमन बनकर यांच्या अटकेच्या कारवाईमुळे सभासदांमध्ये एकच आनंदाचे उधाण आले आहे. तर जिल्हा निबंधक कार्यालय आता सोसायटी संचालकांविरोधात कोणती कारवाई करते याकडे जिल्हाभरातील शिक्षकांचे लक्ष आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?