एनडीएसटी गैरव्यवहार :अध्यक्ष बनकर यांची कारागृहात रवानगी...संचालक मंडळाला पाठीशी घातल्याचा शिक्षकांकडून आरोप  

2ramrav_20bankar.jpeg
2ramrav_20bankar.jpeg

नाशिक : एनडीएसटी सोसायटीच्या कार्यालयातून सचिव व संचालकाने इतिवृत्त पळवून नेले असेल, तर सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली पाहिजे. या प्रकरणी सध्या त्रिसदस्यीय चौकशी सुरू आहे. समितीच्या अहवालानंतरच ठोस कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने स्पष्ट केले आहे. उपनिबंधकांकडून संचालक मंडळाला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप संतप्त शिक्षक सभासदांकडून होत आहे. दरम्यान, सोसायटीचे अध्यक्ष रामराव बनकर यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत केली आहे. 

संचालक मंडळ अडकण्याची दाट शक्‍यता
शहरातील नामांकित एनडीएसटी सोसायटीतील लाचप्रकरणी शाखा व्यवस्थापक, व्यवस्थापकापाठोपाठ सोसायटीचे अध्यक्ष बनकरही लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे सोसायटीच्या संचालक मंडळाचा गैरकारभार बाहेर येऊ लागला आहे. एकीकडे लाचलुचपत विभागाकडून, तर दुसरीकडून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सभासदांनी तक्रारी केल्याने त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी सुरू आहे. यात संचालक मंडळ अडकण्याची दाट शक्‍यता आहे. त्यामुळेच, गेल्या गुरुवारी (ता. 2) सोसायटीचे सचिव जिभाऊ शिंदे, संचालक बाळासाहेब ढोबळे यांनी सोसायटीच्या कार्यालयात जाऊन कपाटातील इतिवृत्त पळविल्याचे समोर आले होते. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे सभासद आक्रमक झाले असून, विविध शिक्षक संघटनांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. 
 
तक्रारीचा अधिकार 

संचालक मंडळाविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रारी केल्याने चौकशी सुरू आहे. त्यामुळे सोसायटीच्या कार्यालयातील दप्तराची जबाबदारी कार्यालयीन कर्मचाऱ्यांची आहे. त्यांच्या कस्टडीतून जर कोणी दस्त नेत असेल, तर पोलिसांत तक्रार देण्याचा अधिकार कार्यालयप्रमुखांना असल्याचे जिल्हा उपनिबंधकांनी स्पष्ट केले. मात्र त्याच वेळी, चौकशी समितीच्या अहवालानंतरच संचालक मंडळावर ठोस कारवाई होणार आहे. त्यामुळे आता चौकशी समितीच्या अहवालाकडे सभासदांचे लक्ष लागून आहे. 

अध्यक्ष मध्यवर्ती कारागृहात 
लाचप्रकरणी सहभाग असलेले सोसायटीचे अध्यक्ष रामराव बनकर यांच्या पोलिस कोठडीची शुक्रवारी मुदत संपली. त्यामुळे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. बनकर यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असता, लाचलुचपत विभागाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे अर्ज फेटाळत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे न्यायालयाने लेखी मागविले आहे. त्यामुळे बनकर यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी (ता. 6) जामिनावर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. 

दस्तावेज पळवून नेल्याची कर्मचाऱ्यांनी द्यावी तक्रार 

सोसायटीच्या कार्यालयाची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे. त्यांच्या कार्यालयातून संचालक दस्त पळवून नेत असतील, तर त्याविरोधात पोलिसांत तक्रार केली पाहिजे, तसेच संचालकांविरोधात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी सुरू असून, त्या अहवालानंतर कारवाई केली जाईल. -गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, नाशिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com