एनडीएसटी लाच प्रकरण : अध्यक्ष बनकर यांचा कारवाईपूर्वीच राजीनामा 

money fraud.jpg
money fraud.jpg

नाशिक : एनडीएसटी सोसायटीतील बहुचर्चित लाचप्रकरणात अटकेत असलेले रामराव बनकर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. याचप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा उपनिबंधक कार्यालयास अहवाल देत बनकर यांना पदावरून हटविण्याबाबत नमूद केले होते. मात्र, त्यांनी कारवाईपूर्वीच राजीनामा दिला. 

उपनिबंधक कार्यालयाच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, संचालक मंडळाने उपाध्यक्ष अण्णा काटे, कार्यवाह जिभाऊ शिंदे, संचालक मोहन चकोर यांना स्वाक्षरीचे अधिकार दिले. मात्र, गेल्या आठवड्यात सोसायटीचे इतिवृत्त पळविल्याचा शिंदे यांच्यावर आरोप असला तरी याबाबत अद्याप सोसायटी कार्यालयाकडून कोणतीही तक्रार पोलिसांत नाही. त्यामुळे या साऱ्या घडामोडींसंदर्भात उपनिबंधक कार्यालयाच्या भूमिकेकडे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून आहे. 

उपाध्यक्ष, कार्यवाह यांना सह्यांचे अधिकार 
बनकर यांच्या अटकेनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्वतंत्र अहवाल तयार करून तो जिल्हा उपनिबंधक कार्यालयास दिला. त्यानुसार, बनकर हे लाचप्रकरणात संशयित असल्याने, त्यांना तातडीने अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे, असे नमुद केले होते. प्रत्यक्षात कारवाई होण्यापूर्वीच मंगळवारी (ता. 7) दुपारी सोसायटीच्या कार्यालयात संचालक मंडळाची अवघ्या काही मिनिटांची बैठक झाली. त्यात बनकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तसेच, कार्यालयीन स्वाक्षरीचे अधिकार उपाध्यक्ष अण्णा काटे, कार्यवाह जिभाऊ शिंदे आणि संचालक मोहन चकोर यांना देण्यात आले. त्यानंतर बनकर यांच्या राजीनाम्याबाबत जिल्हा उपनिबंधकांना पत्र देण्यात आले. 

कृती समितीचे आज आंदोलन 
माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली एनडीएसटी बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे पुरुषोत्तम रकिबे हे निमंत्रक असून, रवींद्र मोरे, साहेबराव कुटे या समितीमध्ये आहेत. समितीतर्फे बुधवारी (ता. 8) दुपारी एकला जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करून, प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात येणार आहे. गेल्या महिनाभरापासून विविध संघटनांनी निवेदने दिली, चौकशीची मागणी करण्यात आली तरीही उपनिबंधक कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन करणार आहेत. 

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

संचालकांचा राजीनामा कार्यालयाकडे आल्यानंतर त्यास मंजुरी दिली जाईल. त्यानंतर संचालकांना नवीन अध्यक्ष निवडीसाठी मुदत दिली जाईल. तर, चौकशी समितीकडून चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संचालक मंडळासंदर्भात कारवाई केली जाईल. आतापर्यंतच्या तक्रारीनुसार चौकशी सुरू आहे. -गौतम बलसाणे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक 

सोसायटीच्या अध्यक्षांनाच लाचप्रकरणात अटक होत असेल, तर संचालक मंडळाला नैतिक अधिकारच राहिलेला नाही. त्यामुळे उपाध्यक्ष, कार्यवाह यांसह संचालकांनी राजीनामा दिला पाहिजे. परंतु, गैरप्रकार समोर येऊ नये म्हणून त्यांच्याकडून पुरावे नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडूनही वेळीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन केले जात आहे. -पुरुषोत्तम रकिबे, निमंत्रक, एनडीएसटी बचाव कृती समिती 

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

प्रशासक नेमण्याची मागणी 
एनडीएसटी सोसायटीचे संचालक मंडळ तातडीने बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करावी, अशी मागणी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना व अनुदानित आश्रमशाळा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संदर्भात जिल्हा उपनिबंधक कार्यालयात नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदनावर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष बावा, राज्य कार्यकारिणी सदस्य बी. एन. देवरे, आर. के. चौधरी, डॉ. हिरालाल बावा, एन. एस. कापडणीस, एम. डी. वाघमोडे, उत्तम झिरवाळ, सी. एन. थोरात, एच. जी. आव्हाड, एस. बी. कापडणीस, जे. एस. पगार, लोकेश पाटील, विजय पाटील, पी. के. मांडवडे, ए. के. आहिरे, व्ही. डी. आहेर, जी. टी. पगार, मिलिंद चौथे, एस. एस. काकडे आदींच्या सह्या आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com