esakal | उत्तर महाराष्ट्रातील ते एकमेव शिवरायांचे मंदिर! राजकीय मंडळी, महापालिका प्रशासनाला विसर 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (32).jpg

उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे राजकीय नेतेमंडळी आणि महापालिका प्रशासनाने पाठ फिरविल्याचे निराशाजनक चित्र समोर आले आहे. गेल्या १५ वर्षांत महापालिका प्रशासनाने शिवमंदिराकडे विकासाच्या दृष्टिकोनातून का लक्ष दिले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

उत्तर महाराष्ट्रातील ते एकमेव शिवरायांचे मंदिर! राजकीय मंडळी, महापालिका प्रशासनाला विसर 

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि.नाशिक) : शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे शहरातील चौकाचौकांत जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे राजकीय नेतेमंडळी आणि महापालिका प्रशासनाने पाठ फिरविल्याचे निराशाजनक चित्र समोर आले आहे. गेल्या १५ वर्षांत महापालिका प्रशासनाने शिवमंदिराकडे विकासाच्या दृष्टिकोनातून का लक्ष दिले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

नाशिककरांचे स्फूर्तिस्थान
मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक नगरीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचेही मंदिर आहे, ही अवघ्या नाशिककरांसाठी मोठ्या अभिमानाची बाब आहे. दीड दशकापासून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे हे शिवराय मंदिर नाशिककरांचे स्फूर्तिस्थान ठरले आहे. विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील हे शिवरायांचे एकमेव मंदिर असून, शहरापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवरायांच्या मंदिराच्या रूपातून ऐतिहासिक वारसा असणे हे म्हसरूळकरांसाठी भाग्याचेच आहे. दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नरकडून म्हसरूळकडे जाताना अर्धा किलोमीटरवर डाव्या बाजूला एक भव्य मंदिर दिसते. त्यावरील ‘शिवराम मंदिर’ ही अक्षरे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर समोर सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची नेत्रदीपक मूर्ती आहे. ३५० किलो वजनाच्या पंचधातूंपासून ही मूर्ती तयार करण्यात आलेली आहे. पुरातत्त्व विभागाच्या माहितीनुसार अशा पंचधातूच्या मूर्ती महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतक्याच आहेत. 

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 

असा आहे इतिहास 
मंदिराच्या इतिहासाबद्दल असे सांगतात, की या मंदिराची उभारणी करणारे डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत पुरोहित म्हणून कार्यरत होते. राज्यात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे उभारण्याचा संकल्प रामचंद्र महाराज यांनी सोडला. त्यानुसार या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. प्रल्हाद गुरूंचे वारस ॲड. विष्णू महाराज पारनेरकर मंदिरात परिवारासह येत असतात. मंदिरातील अडचणीसह अन्य विषय चर्चा करून मार्गी लावतात. 

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश


विकासासाठी पुढाकाराची गरज 
मंदिरासाठी शासनाकडून विशेष निधी देऊन सुशोभीकरण करवे. पुरातत्त्व विभागाकडून, तसेच महापालिकेकडून मंदिराच्या वैभवाच्या जतनाबाबत विचार करावा, यासाठी नगरसेवक तसेच पुढाऱ्यांनी प्रयत्नशील राहावे, असे म्हसरूळकरांकडून बोलले जात आहे. माजी महापौर रंजना भानसी यांच्या प्रभागात हे मंदिर असून, त्यांच्या कार्यकाळातही या मंदिरासाठी काहीही तरतूद न केल्यामुळे नाराजीची भावना व्यक्त केली जात आहे. निदान विद्यमान स्थायी समिती सभापती गणेश गिते तरी या मंदिराच्या विकासासाठी पुढाकार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.