नवनिर्वाचित स्थायी समिती सभापतींचे विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट; पायाभूत सुविधा करणार भक्कम

 Standing Committee Chairman Ganesh Gite
Standing Committee Chairman Ganesh Gite

नाशिक : समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड, केंद्र सरकारने यापूर्वीच मंजूर केलेला नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग, मेट्रो निओसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हजार ९२ कोटी रुपयांची गुंतवणूक, तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर केलेले वैद्यकीय महाविद्यालय, अन्नप्रक्रिया उद्योग आदी कारणांमुळे भविष्यात नाशिकच्या विकासाचा वेग आतापेक्षा अधिक पटीने वाढणार आहे. त्यातून शहराची लोकसंख्यादेखील वाढणार असल्याने त्या अनुषंगाने पायाभूत सुविधा अधिक भक्कम करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती गणेश गिते यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

महापालिकेच्या इतिहासात सलग दोनदा सभापती झाल्यानंतर गणेश गिते यांनी शहराच्या विकासाचे व्हिजन डॉक्युमेंट मांडले. ते म्हणाले, की स्वच्छ हवामान, मुंबई, पुणे सुवर्ण त्रिकोणातील महत्त्वाची बाजू असलेले नाशिक देशात वेगाने विस्तारणारे चौथे शहर आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधा जसे रस्ते, उड्डाणपूल, मलनिस्सारण व्यवस्था, जलदाय व्यवस्था, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य सुविधा आताच सक्षम करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास शहराला बकाल स्वरूप येईल. पायाभूत सुविधा निर्माण करताना नागरिकांच्या मनोरंजन, क्रीडाविषयक गुणांनादेखील चालना मिळाली पाहिजे, या हेतूने भाजपच्या महापालिकेतील सत्ताकाळात नियोजनाबरोबरच प्रकल्प अमलात आणले जात आहेत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास गेल्या काही वर्षांत एक, दोन, तीन या टप्प्यांप्रमाणे १००, २०० व अडीचशे कोटींचे रस्ते तयार करण्यात आले. रस्त्यांवर फक्त डांबर ओतण्याचे काम झाले नाही, तर नव्याने तयार होणाऱ्या नवनगरे मुख्य रस्त्यांना जोडण्याचे अर्थात मिसिंग लिंक तयार करण्याचे काम करण्यात आले. विजेची बचत व अंधारमुक्त शहर करण्यासाठी एलईडी दिवे बसविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सध्या ९० टक्के एलईडी दिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. नवनगरांमध्ये पथदीपांची सोय करण्यासह खराब झालेले ३० हजार विद्युत खांब बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. मलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी १२० किलोमीटरच्या मलवाहिकांचे जाळे नव्याने टाकण्यात आले आहे. शहरातील सार्वजनिक व्यवस्था बळकट करण्यासाठी शहर बससेवा महापालिकेतर्फे चालविली जाणार आहे. प्रदूषण कमी करणाऱ्या सीएनजी, इलेक्ट्रिकच्या बस येत्या काही महिन्यांत सुरू होतील. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व आरोग्यसेवा भक्कम करण्यासाठी नाशिक रोडच्या नवीन बिटको रुग्णालयाला सुपरस्पेशालिटीचा दर्जा देण्याबरोबरच डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी पदविका अभ्यासक्रम सुरू केला जात आहेत. दिव्यांगांकरिता प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे. २५ कोटी रुपये खर्च करून पंचवटी व नाशिक रोड विभागात नाट्यगृह उभारले जात आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे दोन उड्डाणपुलांची निर्मिती येत्या दोन-तीन वर्षांत केली जाणार आहे. वाढत्या शहरासाठी महानगर गॅस लिमिटेड कंपनीमार्फत पाइपाद्वारे घरपोच स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. 

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

५० मेगावॉटचा सोलर प्रकल्प 
शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार विजेचा वापरदेखील वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे अडीचशे कोटींचा ५० मेगावॉटचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील २५ वर्षे वीज उपलब्ध होऊन महापालिकेच्या ५० कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे सभापती गिते यांनी माहिती दिली. 

महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य 
-वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन पार्किंग मॉल उभारणे. 
-महापालिकेच्या शाळा स्मार्ट करणे. 
-पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी शहरात जलकुंभ उभारणे. 
-नवनगरांमध्ये ३८ किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकणे. 
-११ हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणे. 

-पालिकेच्या २२ मिळकती बीओटीवर विकसित करणे. 
-दादासाहेब फाळके स्मारकाचा विकास. 
-रिक्त जागा मानधनावर भरून कामकाजाचा ताण कमी करणे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com