ग्रामपंचायत निवडणूक : दोन ग्रामपंचायती, ५० वर उमेदवार बिनविरोध; मालेगाव तालुक्यात माघारीनंतरचे चित्र स्पष्ट

grampanchayat
grampanchayat

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या माघारीनंतर प्रचाराला धुमधुडाक्यात सुरवात झाली. लढतीचे चित्र स्पष्ट होताच उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रणनीती ठरवत बैठकांचे सत्र सुरू केले. निवडणुकीसाठी एकूण ३४९ प्रभागांतून ९६९ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. यांपैकी ५० पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

लखाणे व चोंढी या दोन ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी तहसील कार्यालयासमोर गुलाल उधळत जल्लोष केला. अर्ज माघारीसाठी सोमवारी तहसील कार्यालयात जणू काही यात्रा भरली होती. मातब्बर इच्छुक माघारीसाठी मनधरणी करताना आढळले. अनेक मातब्बरांचा तरुणांच्या धिटाईपुढे माघारीचा प्रयत्न असफल ठरला. काही उमेदवारांची माघार लाखमोलाची ठरली. काही उमेदवार विजयासाठी नव्हे, तर हितशत्रूंना नामोहरम करण्यासाठीच उभे असलेलेही दिसून आले. जुने वाद, भाऊबंदकी, वाड्यावस्त्यांमधील विवाद, विकासकामांतील अडसर हे विषयही माघारीत चर्चेत होते. अनेक उमेदवार जाणूनबुजून मुदत संपल्यानंतर आले. त्या वेळी गावकारभाऱ्यांनी तहसीलदार चंद्रजित राजपूत यांना विविध प्रश्‍नांवर चौकशी करून भंडावून सोडले. माघारी व रिंगणातील उमेदवारांचे चिन्हवाटप हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने संपूर्ण तालुक्याचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. 

लखाणेत बिनविरोध 

लखाणे ग्रामपंचायतीची निवडणूक माघारीनंतर बिनविरोध झाली. ग्रामपंचायतीत सातपैकी शिवसेनेच्या सहा व अन्य एक असे सातही उमेदवार बिनविरोध विजयी झाले. या उमेदवारांमध्ये वॉर्ड एक मंजाबाई इंगळे, सोनाली शेवाळे, रंगनाथ गायकवाड. वॉर्ड दोन सुरेखा देवरे, सुरेश चव्हाण. वॉर्ड तीन बाबू सोनवणे, सरला कुवर. शिवसेनेच्या बिनविरोध झालेल्या सहा उमेदवारांनी समर्थकांसह कृषिमंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात भेट दिली. उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, मनोहर बच्छाव, शशिकांत निकम, शरद कासार, नीलेश काकडे यांच्या हस्ते नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रवीण इंगळे, सुरेश देवरे, किशोर इंगळे, गजेंद्र देवरे, अतुल देवरे, बापू शेवाळे, सागर इंगळे, श्यामराव इंगळे, सर्जेराव इंगळे, सुनील देवरे, राकेश इंगळे, नीलेश इंगळे, भालेराव, इंगळे, आत्माराम इंगळे, समाधान देवरे, विशाल देवरे, खुशाल इंगळे आदींनी परिश्रम घेतले. 

टेहेरेच्या १३ पैकी ६ जागा बिनविरोध 

शहरानजीकच्या टेहेरे ग्रामपंचायतीत १३ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या. यात वॉर्ड दोनमधून श्रीकांत शेवाळे, वॉर्ड तीनमधून कविता पाटील, वॉर्ड चारमधून सुधाकर पाटील, शांताबाई अहिरे, वॉर्ड पाचमधून पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांच्या पत्नी उज्ज्वला पाटील व सुनंदा गायकवाड असे सहा उमेदवार बिनविरोध झाले. 

सावकारवाडीत पाच बिनविरोध 

सावकारवाडी ग्रामपंचायतीत नऊ जागांपैकी पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात वॉर्ड दोनमधून माजी सरपंच महेंद्र ऊर्फ आबा साळुंके, वैभव साळुंके, सीमा साळुंके, वॉर्ड तीनमधून भावना मोरे, सीमा रायते हे पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले. उर्वरित चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. 

टाकळीतील दोन उमेदवार बिनविरोध 

टाकळीतील १३ पैकी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखालील वॉर्ड दोनमधून शीतल पवार व वॉर्ड तीनमधून भरत शेवाळे हे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. उर्वरित ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात असून, येथील सरळ लढती रंगतदार ठरणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com