गृहिणींमध्ये संताप...नाशिकच्या ग्राहकांची गॅस सिलेंडरची ३० कोटींची सबसिडी बुडाली?

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 10 July 2020

जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. घरगुती सिलिंडरचे दरदेखील सहाशेच्या पुढे गेले आहेत. त्यातच सरकारने सिलिंडरसारख्या आवश्‍यक बाबीवरील सबसिडी बंद केली आहे. त्यामुळे कुटुंबाचे बजेट आणखी कोलमडले

नाशिक : नाशिक शहरातील तीन लाख ७६ हजार ५६४ आणि जिल्ह्यातील नऊ लाख १३ हजार ६७४ अशा एकूण १२ लाख ९० हजार २३८ गॅस सिलिंडर ग्राहकांची केंद्र सरकार महिन्याला सर्वसाधारणपणे दहा कोटी ६८ लाख रुपयांची सबसिडी बँकेतील खात्यावर जमा करते. पण गेल्या तीन महिन्यांपासून ही एकूण ३२ कोटींहून अधिक सबसिडी ग्राहकांना मिळालेली नाही.

तीन महिन्यांच्या ३२ कोटींच्या सबसिडीवर फुली 

अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरची किंमत जवळपास सारखी असल्याने सबसिडी मिळाली नसल्याचे कारण कंपन्यांकडून पुढे केले जात आहे. मात्र ही बाब ग्राहकांना मान्य नाही. कोरोनाच्या आपत्तीच्या काळात केंद्र सरकारच्या सबसिडी न देण्याच्या धोरणाबद्दल गृहिणी संतापल्या आहेत. 
गॅस सिलिंडरची सबसिडी का मिळत नाही याची विचारणा केल्यावर कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सबसिडीबद्दल ग्राहकांची तक्रार नसल्याचा पहिला मुद्दा स्पष्ट केला. तसेच आधारकार्ड बँक खात्याला संलग्न केले नसणार, बँक खात्यातील देवाणघेवाण सुरू नसणार, बँक खात्यात बदल झाला असेल, बँकेचा आयएफएससी कोड चुकीचा असेल, केवायसी प्रलंबित असणार अशी अनेक कारणे नमूद केल्यावर अनुदानित आणि विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीचा मुद्दा पुढे करण्यात आला आहे. देशातील १४ कोटी ८५ लाख ७३ हजार तीन सिलिंडरपोटी दोन हजार १४१ कोटींची सबसिडी जमा केली जाते. तसेच महाराष्ट्रात एक कोटी ५१ लाख ५९ हजार ९७७ ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी १७३ कोटींची सबसिडी दरमहा खात्यात जमा होत असते. 

कंपनीनिहाय नाशिकची दरमहाची स्थिती 
भाग आयआसी (IOC) भारत पेट्रोलियम हिंदुस्थान पेट्रोलियम 
नाशिक शहर ५ हजार ३४५ २ लाख ७५ हजदार ७९७ ९५ हजार ४२२ 
जिल्हा ६१ हजार २०६ ५ लाख १५ हजार ५६७ ३ लाख ९६ हजार ९०१ 
सबसिडी ०.७२ कोटी रुपये ६ कोटी १३ लाख रुपये ३ कोटी ८३ लाख रुपये 

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!

जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहे. घरगुती सिलिंडरचे दरदेखील सहाशेच्या पुढे गेले आहेत. त्यातच सरकारने सिलिंडरसारख्या आवश्‍यक बाबीवरील सबसिडी बंद केली आहे. त्यामुळे कुटुंबाचे बजेट आणखी कोलमडले. त्यामुळे सबसिडी देण्याचा विचार सरकारने अमलात आणावा. -अंजली भालचंद्र गंगावणे, सोमवार पेठ 

घरगुती गॅस सिलिंडरवर या वर्षीच्या मार्चपर्यंत सबसिडी मिळत होती. ती अचानक बंद करण्यात आली. कोरोनामुळे एकीकडे घरगुती खर्चाचे गणित बिघडले, दुसरीकडे केंद्र सरकारने सिलिंडरची सबसिडी बंद करून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. -योगिता हेमंत जगताप, दहीपूल 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

देशाला कोरोना विषाणू संसर्गाने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत सरकारने गॅस सिलिंडर सबसिडी बंद करून काय साधले? अडचणीच्या काळात सामान्यांची फसवणूक करणे योग्य नाही. -प्रज्ञा राजेंद्र पोरजे, मखमलाबाद  

(संपादन - ज्योती देवरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Nashik consumers gas cylinder subsidy marathi news