जिल्हा परिषद बनावट नियुक्त प्रकरण : 'त्या' दोन महिला कर्मचाऱ्यांचा जामीन अर्ज नामंजूर

युनूस शेख
Friday, 22 January 2021

लोकायुक्तांच्या नावाने पत्र आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणकीय स्वाक्षरीचा वापर करून सुशिक्षित बेरोजगारांना बनावट नियुक्तिपत्र देण्याचा प्रकार ४ डिसेंबरला उघडकीस आला होता.

जुने नाशिक : जिल्हा परिषद बनावट नियुक्त प्रकरणी जिल्हा परिषदेतील दोन महिला कर्मचाऱ्यांची नावे समोर आली आहेत. त्यातील एक निवृत्त कर्मचारी असून, दुसरी सध्या बांधकाम विभागात कार्यरत आहे. दोघींनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. बुधवारी (ता. २०) झालेल्या सुनावणीत त्यांचा अटकपूर्व अर्ज फेटाळण्यात आला. 

सुशिक्षित बेरोजगारांना बनावट नियुक्तिपत्र देण्याचा प्रकार

लोकायुक्तांच्या नावाने पत्र आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संगणकीय स्वाक्षरीचा वापर करून सुशिक्षित बेरोजगारांना बनावट नियुक्तिपत्र देण्याचा प्रकार ४ डिसेंबरला उघडकीस आला होता. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासमोर ७ डिसेंबरला प्रकरण समोर आले. चौकशी करून त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार आरोग्य विभागाचे प्रभारी प्रशासन अधिकारी प्रकाश थेटे यांच्या तक्रारीवरून १० डिसेंबरला भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी संदीप वऱ्हाडे यांनी तपास करत दुसऱ्याच दिवशी जिल्हा परिषद कर्मचारी रवींद्र वाघ आणि बनावट ओळखपत्र छपाई करणारा संशयित अंकुश कर्डिले त्यानंतर पुढील तपासात बनावट सही करणारा संतोष जाधव यासह मुख्य संशयित उमेश उदावंत अशा चौघांना अटक केली. त्यांची अधिक चौकशी केली असता जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांची नावे समोर येण्याची शक्यता वऱ्हाडे यांनी व्यक्त केली होती. 

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा

जामीन अर्ज नामंजूर 

त्या दिशेने तपास सुरू होता. त्यात जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दोन महिलांची नावे समोर आली आहेत. त्यातील एक महिला कर्मचारी काही दिवसांपूर्वी निवृत्त झाली आहे. दुसरी जिल्हा परिषद बांधकाम विभागात कार्यरत असून, सध्या वैद्यकीय सुटीवर आहे. दोघींनी गेल्या आठवड्यात जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. बुधवारी (ता. २०) त्यावर सुनावणी झाली. तपासी अधिकारी वऱ्हाडे यांनी गुन्ह्याचे गांभीर्य आणि त्याची चौकशी करणे आवश्‍यक असल्याचे न्यायालयास पटवून दिल्याने त्याचा जामीन अर्ज रद्द केला. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

 दोन दिवसांत अटक 

दोघींना अटक करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांना दोन दिवसांत अटक होण्याची शक्यता आहे. त्यांच्या चौकशीत आणखी माहिती, तसेच जिल्हा परिषदेतील अन्य कुणाचा सहभाग आहे का याची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about Zilla Parishad fake appointment letter case nashik marathi news