esakal | रात्री संचारबंदी; प्रसंगी फौजदारी गुन्‍हे दाखल करणार - पालकमंत्री छगन भुजबळ
sakal

बोलून बातमी शोधा

sakal (54).jpg

जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, यात शहरातील रुग्‍णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर अत्‍यावश्‍यक सेवा वगळता नाशिक शहरात रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू केली आहे

रात्री संचारबंदी; प्रसंगी फौजदारी गुन्‍हे दाखल करणार - पालकमंत्री छगन भुजबळ

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, यात शहरातील रुग्‍णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्‍वभूमीवर अत्‍यावश्‍यक सेवा वगळता नाशिक शहरात रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. तसेच, जिल्हाभरात मास्‍क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत एक हजार रुपये दंड केला जाणार असून, प्रसंगी फौजदारी गुन्‍हे दाखल केले जातील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मास्‍क न वापरणाऱ्यांना जिल्ह्यात एक हजाराचा दंड 
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. २१) भुजबळ फार्म येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

दंड व प्रसंगी फौजदारी कारवाईदेखील

भुजबळ म्‍हणाले, की पाच दिवसांत उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येत ५३४ ने वाढ झाली आहे. यापैकी तब्बल ४१० बाधित नाशिक महापालिका हद्दीतील आहेत. त्‍यामुळे शहरात रात्री संचारबंदी लागू करत आहोत. त्यानंतरही रुग्‍णसंख्या न घटल्यास आणखी कठोर भूमिका घेतली जाईल, असेही त्यांनी स्‍पष्ट केले. तसेच, जिल्ह्यात मास्‍क वापरणे बंधनकारक असून, टाळाटाळ करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड व प्रसंगी फौजदारी कारवाईदेखील केली जाईल. 

लग्‍न समारंभांना परवानगी आवश्‍यक 
लग्‍न समारंभांसाठी पोलिसांची परवानगी आवश्‍यक असेल. नागरिकांनी गोरज मुहूर्ताचा आग्रह न धरता उपस्‍थिती मर्यादित राहील, या पद्धतीने सोहळ्यांचे नियोजन करावे. यासंदर्भात लॉन्‍स, मंगल कार्यालयांच्‍या संचालकांना सूचना केल्‍या जाणार आहेत. तसेच, लग्‍न समारंभांमध्ये धडक कारवाई करतानाच मास्‍क न वापरणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे श्री. भुजबळ यांनी स्‍पष्ट केले. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

सरकारी कर्मचाऱ्यांनी २८ पर्यंत लस घ्यावी 
६९ हजार सरकारी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधकात्‍मक लस घेतली आहे. पुढील टप्प्‍यात सामान्‍यांसाठीही लसीकरण मोहीम राबवायची असल्‍याने, सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत लसीकरण करून घेण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले. ८० हजार लसीकरणासाठीचा औषधसाठा उपलब्‍ध असल्‍याचेही त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री भुजबळ म्‍हणाले... 
* शाळा-महाविद्यालये सुरूच राहणार 
* शनिवारी आढावा बैठकीनंतर घेणार पुढील निर्णय 
* ऑक्सिजन साठा, रुग्‍णालयात मुबलक खाटा उपलब्‍ध 
* दुकानांमध्ये सॅनिटायझरसह आवश्‍यक बाबींची तरतूद