Nisarga cyclone : महिला ठार...मेंढ्या मृत्युमुखी..आणि...कहर....

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 4 June 2020

नाशिकमध्ये आगमन झालेल्या चक्रीवादळाने ऐनवेळी दिशा बदलताना पश्‍चिम पट्ट्यातील तीव्रता कमी करीत, टाकेद- पांढुर्ली सिन्नरसह पूर्व पट्ट्यातील अनेक तालुक्‍यांत दाणादाण उडविली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर-हरसूलमार्गे जाणाऱ्या निसर्ग चक्रीवादळ इगतपुरीतून पश्‍चिमेऐवजी सिन्नर-येवला अशा पूर्वेकडील तालुक्‍याच्या दिशेने घुसले

नाशिक : नाशिकमध्ये आगमन झालेल्या चक्रीवादळाने ऐनवेळी दिशा बदलताना पश्‍चिम पट्ट्यातील तीव्रता कमी करीत, टाकेद- पांढुर्ली सिन्नरसह पूर्व पट्ट्यातील अनेक तालुक्‍यांत दाणादाण उडविली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर-हरसूलमार्गे जाणाऱ्या निसर्ग चक्रीवादळ इगतपुरीतून पश्‍चिमेऐवजी सिन्नर-येवला अशा पूर्वेकडील तालुक्‍याच्या दिशेने घुसले. दरम्यान, औद्योगिक वसाहतींना वादळाचा फटका बसला. यामुळे गुरुवारी (ता. 4) नाशिक शहरासह सिन्नर औद्योगिक वसाहतीत पाणीपुरवठा होणार नसल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. विजेअभावी व्यावसायिक आस्थापना रात्री साडेचार तास अंधारात होत्या. राहुरीत विजेच्या धक्‍क्‍याने महिला ठार झाली, तर पिंपळगाव बसवंत परिसरात तीन मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. दरम्यान, रात्री सरासरी 40 ते 50 किलोमीटर वेगाने निसर्ग चक्रीवादळ खानदेशमार्गे मध्य प्रदेशकडे घोंघावले. 

Image may contain: indoor

औद्योगिक वसाहतीचा पाणीपुरवठा ठप्प 
वीज वितरण कंपनीने 15 उपकेंद्रे बंद ठेवल्याने सातपूर, अंबड, तसेच सिन्नर औद्योगिक वसाहतीत वीज खंडित होऊन कंपन्यांना उत्पादन बंद करावे लागले. सिन्नर औद्योगिक क्षेत्रासाठी असलेल्या पंपिंग स्टेशनमध्ये वीज खंडित झाल्याने पंपिंग होऊ शकले नाही. दुपारनंतर सिन्नर औद्योगिक क्षेत्रात पाणीपुरवठा करणे शक्‍य होणार नसल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. तसेच पावसाची तीव्रता लक्षात घेता अनेक खासगी आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना दुपारनंतर सुटी दिली. नाशिक शहर व परिसरातील झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याने शहरातील अग्निशामक दलाच्या सर्वच केंद्रांतील फोन उशिरापर्यंत खणखणत होते. सुदैवाने यामुळे कोठेही हानी झाल्याचे वृत्त नाही. 

Image may contain: plant, tree, table, flower, outdoor and nature

जुना वाडा कोसळला 
अशोक स्तंभ परिसरातील नवीन तांबट आळीतील विद्या पंपालिया यांच्या मालकीच्या तीनमजली वाड्याचा काही भाग बुधवारी (ता. 3) दुपारी कोसळला. हा वाडा जीर्ण झाल्याने मालक व अन्य भाडेकरूंनी आधीच स्थलांतर केल्याने जीवित व वित्तहानी टळली असली तरी यानिमित्ताने जुन्या वाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. शिंगाडा तलाव येथील मुख्य अग्निशामक दलाच्या जवानांनी वाड्याचा उर्वरित धोकादायक भाग उतरवून घेतला. 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

Image may contain: cloud, sky, tree, outdoor and nature

वृक्ष उन्मळले 
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर काही ठिकाणी वृक्षांच्या मोठ्या फांद्याही पडल्या. त्र्यंबक रस्त्यावरील फ्रावशी अकादमीशेजारील तसेच गंगापूर रोडवरील जेहान सर्कल, सातपूरला कामगारनगर व महिंद्र कंपनीजवळ, तर पंचवटीत हिरावाडी यांसह ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. 

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!

Image may contain: ocean, water, outdoor and nature

हेडलाइटमध्ये प्रवास 
मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा बुधवारी दुपारनंतर जोर वाढला. त्यामुळे दुपारी चारला रस्त्यावरील वाहने अतिशय संथगतीने हेडलाइट सुरू करून मार्गक्रमण करीत होती. रस्त्यावर वाहनांची संख्यादेखील अत्यल्पच होती. पावसामुळे लॉकडाउन झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nisarga cyclone affect nashik marathi news