‘कुणी कॅश देता का हो कॅश..’ ऐन दिवाळीत सटाणात एटीएममध्ये खडखडाट 

रोशन खैरनार
Saturday, 14 November 2020

‘दिवाळी पाडवा’ व भाऊबीज असल्याने बँकांना सुटी आहे. यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली असून, बाजारपेठेत रोकडची चणचण जाणवत आहे. दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याने बहुतांश नागरिक कॅशसाठी एटीएमवरच अवलंबून आहेत.

सटाणा (जि.नाशिक) : सणासुदीचे दिवस आणि सटाणा शहरातील एटीएम मशिनमध्ये पैसे शिल्लक नाहीत, हे समीकरण शहरवासीयांसाठी मोठ्या गैरसोयीचे ठरत आहे. आता ऐन दिवाळीमध्ये शहरातील जवळपास सर्वच बँकांच्या ‘एटीएम’मध्ये खडखडाट असून, बहुतांश एटीएमबाहेर ‘नो कॅश’चे फलक लावले आहेत. यामुळे ग्राहकांची मोठी कुचंबना होत असल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दिवाळी असल्याने बँकांनी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र बँकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असल्याचा आरोप होत आहे. 

ऐन दिवाळीत सटाणा शहरातील एटीएममध्ये खडखडाट 
गुरुवार (ता. १२)पासून दिवाळीच्या प्रकाशपर्वाला सुरवात झाली. शुक्रवारीही (ता. १३) बँका सुरू असल्या तरी गेल्या दोन दिवसांपासून बहुतांश एटीएममध्ये आधीपासूनच खडखडाट होता. आता सलग तीन दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढणार आहेत. शनिवारी (ता. १४), रविवारी (ता. १५) साप्ताहिक, तर सोमवारी (ता. १६) ‘दिवाळी पाडवा’ व भाऊबीज असल्याने बँकांना सुटी आहे. यामुळे ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली असून, बाजारपेठेत रोकडची चणचण जाणवत आहे. दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याने बहुतांश नागरिक कॅशसाठी एटीएमवरच अवलंबून आहेत. यासाठी बँकांनी एटीएममध्ये आवश्यक कॅश भरणे गरजेचे आहे. 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

बाजारपेठेवरही थेट परिणाम 
आता जवळपास सर्वच बँकांनी ऑनलाइन व्यवहारांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र अजूनही मोठा वर्ग एटीएम, मोबाईल अॅप आणि ऑनलाइन व्यवहारापासून लांबच असल्याने ते रोखीतच व्यवहार करण्यास पसंती देतात. त्यामुळे ग्राहकांना रोख रकमेची चणचण भासत असून, त्याचा बाजारपेठेवरही थेट परिणाम होत आहे. शहरातील एकमेव हस्ती बँकेचे एटीएम केंद्र शुक्रवारी दुपारपर्यंत सुरू असल्याने या केंद्रावर ग्राहकांची गर्दी होती. ऐन सणासुदीच्या काळात शहरातील सर्व बँकांनी एटीएम मशिन सुरू राहतील याची काळजी घ्यावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. 

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर

दिवाळी सण आणि सलग तीन दिवस सुट्या असल्याचे माहीत असूनही बँकांनी कोणतेही नियोजन न ठेवल्याने सर्वच एटीएममध्ये खडखडाट आहे. बँकांच्या या नियोजनशून्य कारभारामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. -किशोर बागूल, निवृत्त शिक्षक 

आज दुपारी नाशिकहून नामपूर येथे जात होतो. मात्र नाशिकमधील एटीएममध्ये पैसे नसल्याने पुढे निघाल्यावर ओझर, पिंपळगाव, देवळा आणि सटाणा या शहरांमधील एटीएममध्येही पैसे नसल्याचे दिसून आले. -पी. के. अहिरे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no cash in ATM Satana on Diwali nashik marathi news