चांदवड उपनगराध्यक्ष कासलीवालांविरोधात अविश्वास ठराव; निवडणुकांच्या तोंडावर नगरसेवक विरोधात

हर्षल गांगुर्डे 
Monday, 12 October 2020

चांदवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेखा गवळी या आदिवासी प्रवर्गातील अल्प शिक्षित महिला आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे गवळी यांची दिशाभूल करून इतिवृत्तावर व शासनाच्या पत्रव्यवहारावर नगराध्यक्षांच्या सह्या घेऊन कासलीवाल मनमानी कारभार करीत आहेत. 

नाशिक : (गणुर) चांदवड नगरपरिषद उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे नगराध्यक्षा रेखा गवळी यांच्या अशिक्षीतपणाचा फायदा घेऊन मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप करत, १३ नगरसेवकांनी कासलीवाल यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याची मागणी आज ता.१२ रोजी नगराध्यक्षा गवळी यांच्याकडे केली आहे. चांदवड नगरपरिषदेचा कार्यकाळ येत्या काही महिन्यांत संपुष्टात येत असतांना ह्या ठरावाची मागणी झाल्याने शहरात खमंग चर्चेला उधाण आले आहे.

चांदवड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रेखा गवळी या आदिवासी प्रवर्गातील अल्प शिक्षित महिला आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे गवळी यांची दिशाभूल करून इतिवृत्तावर व शासनाच्या पत्रव्यवहारावर नगराध्यक्षांच्या सह्या घेऊन कासलीवाल मनमानी कारभार करीत आहेत. नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत इतर नगरसेवकांना कासलीवाल हे विश्वासात घेत नाहीत. यामुळे त्यांच्यावर अविश्वास ठराव आणावा अशी मागणी शिवसेनेचे गटनेते जगन्नाथ राऊत, नगरसेवक बाळू वाघ, कविता वाघ, कॉंग्रेसच्या नगरसेविका मीनाताई कोतवाल, लीलाबाई कोतवाल, रविंद्र अहिरे, राष्ट्रवादीचे नगरसेवक नवनाथ आहेर, अल्ताफ तांबोळी, भाजपाच्या नगरसेविका जयश्री हांडगे, सुनिता पवार, इंदुबाई वाघ, अपक्ष नगरसेवक अशपाक खान, देविदास शेलार आदी १३ नगरसेवकांनी निवेदनाद्वारे नगराध्यक्षा रेखा गवळी यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

तिकीट कापले जाण्याची भीती म्हणून नगरसेवक फुटले!

दरम्यान उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल हे भाजपा पक्षाचे आहेत. मात्र त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी करण्यात भाजपा च्या देखील नगरसेवकांचा समावेश आहे. याबाबत कासलीवाल यांचे मत जाणून घेतले असता निवडणूक महिन्यावर असताना तिकीट कापले जाईल या भितीने पक्षातीलच नगरसेवकांनी हा पवित्रा घेतल्याची माहिती त्यांनी दिली. 

शहरात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, अशात मी पहिल्या पासून उत्कृष्ट काम कसे होईल यास प्राधान्य दिले आहे. नगरपरिषदेत असताना मागील भाजपा सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी आणला. एवढे दिवस माझे काम चालले मग निवडणूक काही महिन्यांवर असताना नगरसेवक अशी भूमिका घेत आहेत. यामागे काही आर्थिक चर्चा देखील कानावर येत आहेत. - भूषण कासलीवाल, उपनगराध्यक्ष चांदवड नगरपरिषद

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No-confidence motion against Bhushan Kasaliwala nashik marathi news