ऑक्सिजन, खाटा, औषधे कमी पडू देऊ नका : भुजबळ 

bhujbal 1234.jpg
bhujbal 1234.jpg

नाशिक : जिल्ह्यात उपलब्ध असलेली कोरोनावरील इंजेक्शन रुग्णांना वेळेत व वाजवी दराने मिळतील, याची दक्षता घ्यावी. तसेच रेमेडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच त्याचा किती साठा उपलब्ध आहे, याबाबत प्रत्येक रुग्णालयाबाहेर फलक लावावा. या इंजेक्शनचा अधिक साठा सरकारी रुग्णालयाच्या औषध विक्री केंद्रातर्फे उपलब्ध करून द्यावा. ऑक्सिजन आणि खाटांची कमतरता भासणार नाही, याचीही काळजी घेण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.२५) येथे दिल्या. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यातील उपाययोजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झाली. या वेळी ते बोलत होते.

शून्य मृत्युदर करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न
शहर-जिल्ह्यातील मृत्युदर आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. येवला उपजिल्हा रुग्णालयात तातडीने सर्व सुविधा व व्यवस्था पूर्ण करण्यात याव्यात, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की जिल्ह्यात ६८ हजार ८२९ कोरोनाग्रस्तांपैकी ८८ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. दहा हजार ८१८ वरून तीन हजाराने जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली आहे. देशात आणि राज्यातील मृत्युदराच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वांत कमी मृत्युदर आहे. शून्य मृत्युदर करण्यासाठी प्रशासन काम करत आहे. 

पंधरा दिवसांत प्रयत्नपूर्वक नवीन क्षमता निर्माण
‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे प्रमाण सर्वाधिक आहे. ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबतही प्रशासनाने पंधरा दिवसांत प्रयत्नपूर्वक नवीन क्षमता निर्माण केली आहे. सध्या ऑक्सिजनचा तुटवडा भासत नाही. सर्वसामान्य नागरिकांना सहजतेने माहिती उपलब्ध होण्यासाठी औषध उपलब्धतेबाबत प्रचार-प्रसार करण्यास प्राधान्य देण्यात यावे. प्रत्येक रुग्णालयाबाहेर खाटा आणि औषध साठ्याबाबत फलक लावण्यात यावेत. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी. तसेच मेडिक्लेमच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी राज्यस्तरावर नेण्यात येऊन सोडविण्यात येतील, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. क्षीरसागर, आहेर यांनी चर्चेत भाग घेतला. मांढरे यांनी जिल्ह्यातील एकूणच व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. आयुक्त जाधव आणि श्रीमती बनसोड यांनी माहिती सादर केली. 

अद्ययावत रुग्णालयासाठी महापालिकेने द्यावे प्राधान्य 
भुजबळ म्हणाले, की रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांत घट होत असली, तरीदेखील भविष्यातील संभाव्य वाढ विचारात घेता ऑक्सिजन, खाटा आणि औषधांची कमतरता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर गर्दीच्या, बाजारपेठांच्या ठिकाणी जनजागृती व प्रसिद्धीवर भर देण्यात यावा. कोरोनाचा शेवटचा रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत सरकार-प्रशासनास स्वस्थ बसता येणार नाही. मुंबईतील केईएमच्या धर्तीवर नाशिकमध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी अद्ययावत महापालिकेतर्फे रुग्णालय तयार करण्यास प्राधान्य देण्यात यावे. शिवाय ऑक्सिजन टाकी लवकर बसवण्यात यावी. याबाबत काय कामे झाली, याची पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आढावा बैठक घेण्यात येईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.  

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, सदस्या सीमंतिनी कोकाटे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com