CoronaUpdate : जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत ४३२ ने घट; ४ हजार ४४२ बाधितांवर उपचार सुरू

अरुण मलाणी
Thursday, 29 October 2020

कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील २२९, नाशिक ग्रामीणचे ४७९, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाह्य ५६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

नाशिक : कोरोनाच्‍या ॲक्‍टिव्‍ह रुग्णांमध्ये जिल्ह्या‍त सातत्‍याने घट होत आहे. गुरुवारी (ता. २९) दिवसभरात ३३५ बाधित आढळून आले असून, ७६६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्या‍त एका रुग्‍णाच्‍या मृत्‍यूची नोंद आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्णसंख्येत ४३२ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत चार हजार ४४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

गुरुवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील २६०, नाशिक ग्रामीणचे ७२, मालेगावचे तीन, तर जिल्‍हाबाह्य दोन बाधितांचा समावेश आहे. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्णांमध्ये नाशिक शहरातील २२९, नाशिक ग्रामीणचे ४७९, मालेगावचे दोन, तर जिल्‍हाबाह्य ५६ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्या‍त महापालिका हद्दीत एका रुग्‍णाच्‍या मृत्‍यूची नोंद झाली आहे. नाशिक ग्रामीण भागात गेल्‍या अनेक दिवसांनंतर कोरोनामुळे दिवसभरात एकही बळी गेला नाही. 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

जिल्ह्या‍तील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९३ हजार ९९ वर पोचली असून, यांपैकी ८६ हजार ९९४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार ६६३ बाधितांचा आतापर्यंत मृत्‍यू झालेला आहे. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ८४२, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४९, मालेगाव रुग्‍णालये व गृहविलगीकरणात सात, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात दोन, जिल्‍हा रुग्‍णालयात चार रुग्ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्ह्या‍त एक हजार १६५ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यांपैकी ७९७ अहवाल नाशिक ग्रामीण भागातील रुग्‍णांचे असून, शहरातील २७२ रुग्‍णांचे अहवाल सायंकाळी प्रलंबित होते. 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of active patients in the district decreased by 432 nashik marathi news