Coronaupdate : जिल्ह्यात ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत २३१ ने वाढ; तर दिवसभरात ९३१ रुग्ण कोरोनामुक्‍त

corona.jpg
corona.jpg

नाशिक : जिल्ह्यात रविवारी (ता. ६) दिवसभरात एक हजार १७४ नवीन कोरोनाबाधित आढळले, तर ९३१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, १२ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांच्‍या संख्येत २३१ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात हजार ६९१ झाली आहे. 

नव्याने आढळले एक हजार १७४

रविवारी आढळलेल्‍या नवीन कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील ७६८, ग्रामीण भागातील ३५१, मालेगावचे ५३, तर जिल्‍हाबाह्य दोन रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४३ हजार ६९० झाली आहे. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ८२१, ग्रामीण भागातील ७४, मालेगावचे ३३, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्ण आहेत. यातून बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ३५ हजार ६६ झाली आहे. दिवसभरातील १२ मृत्‍यूंमध्ये नाशिक शहरातील आठ, ग्रामीणचे तीन, तर मालेगाव महापालिका हद्दीतील एका रुग्णाची नोंद आहे. 

इतके रुग्‍णांच्‍या स्‍वॅबचे अहवाल प्रलंबित

जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ९३३ झाली आहे. दरम्‍यान, दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ८५, नाशिक ग्रामीण व गृहविलगीकरणात १२२, मालेगाव महापालिका व गृहविलगीकरणात ३५, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटर येथे २६, जिल्‍हा रुग्‍णालयात चार संशयित दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ५३७ रुग्‍णांच्‍या स्‍वॅबचे अहवाल प्रलंबित होते. 

होम क्वारंटाइन वृद्धाचा मृत्यू 

सिडको : महाराणाप्रताप चौक भागातील सावरकर चौकात राहणारे ७५ वर्षीय वृद्ध पाच दिवसांपासून कोरोनाबाधित असल्याने होम क्वारंटाइन करण्यात आले होते. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्यांना औषध-गोळ्या सुरू होत्या; परंतु रविवारी सहाव्या दिवशी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 

मालेगावात वाढतेय रुग्णसंख्या 

मालेगाव : शहरातील कॅम्प-संगमेश्‍वरचा पश्‍चिम भाग व तालुक्यातही रोज मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. रविवारी (ता. ६) पुन्हा १३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तत्पूर्वी शनिवारी (ता. ५)ही ९० रुग्ण आढळले होते. गेल्या दीड महिन्यापासून येथील रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरातील कॅम्प-संगमेश्‍वर, सोयगाव, कलेक्टरपट्टा, गवळीवाडा, गोविंदनगर, बारा बंगला, पंचशीलनगर, मोठाभाऊनगर, आनंदनगर, आदर्शनगर, कृषिनगर, तसेच ग्रामीण भागातील दाभाडी, एरंडगाव, डोंगराळे, कौळाणे, वडगाव, द्याने, पाटणे, झोडगे, हाताणे, रावळगाव, वडेल, देवारपाडे, येसगाव खुर्द येथील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील कोरोनाबळींची संख्या ११४ झाली आहे. 

ओझरला प्रशासनाची दमछाक 

ओझर : येथे रविवारी २३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची दमछाक होत असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. ओझरसह परिसरात आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ४०० झाली आहे. त्यांपैकी १२ जणांचा मृत्यू झाला असून, २७० रुग्ण बरे झाले आहेत, तर ११८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये ओझर टाउनशिपमधील चार, शिवाजीनगर व दिक्षी येथील प्रत्येकी तीन, शिवाजी रोड भागातील दोन आणि राजवाडा, समर्थनगर, माळी मंगल कार्यालय, टिळकनगर, निवृत्तिनाथनगर, यमुनानगर, लक्ष्मीनगर, वरचा माळीवाडा, अनुसया पार्क, सिन्नरकर टाउन, दात्याने येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  

संपादन - किशोरी वाघ


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com