मागणीअभावी 'कोमेजला' फुलबाजार...देऊळबंदमुळे ग्राहकसंख्येत घट!

FlowerMarket2.jpg
FlowerMarket2.jpg

नाशिक/पंचवटी : श्रावण म्हटले, की उपवास, व्रतवैकल्यांचा महिना. कोरोनामुळे शहरातील सर्वच प्रमुख मंदिरे बंदच आहेत. त्याचा परिणाम गणेशवाडीतील फुलबाजारावर झाला आहे. कोणत्याच फुलांना मागणी नसल्याने विक्रेते त्रस्त झाले आहेत.

ऐन श्रावणातही मंदिरे बंदच

गणेशवाडी परिसरातील भाजी मंडईजवळ रोज सकाळी फुलबाजार भरतो. याठिकाणी सर्व प्रकारची फुलांची विक्री होत असल्याने व धार्मिकनगरी अशी शहराची ओळख असल्याने दररोज लाखोंचा व्यवहार होतो. परंतु कोरोनामुळे प्रशासनाने मार्चपासून आस्थापने बंद केले. त्यात मंदिरेही कुलूपबंद झाल्याने सहाजिकच फुलबाजारावर परिणाम झाला. शहरासह परिसरातील अनेक गावांतील फुल उत्पादक सकाळी फुले विक्रीसाठी येतात. झेंडू, गुलाब, गेलडा, शेवंती अशी सर्वच प्रकारची फुले उपलब्ध होत असल्याने किरकोळ फुल विक्रेत्यांसह विविध मंदिरांजवळ फुलविक्री करणारे किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येतात. मध्यंतरी शासनाने अनेक व्यावसायिकांना व्यवसायास परवानगी दिली. परंतु अद्यापही देवदर्शनास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे ऐन श्रावणातही मंदिरे खुली होऊ शकली नाहीत.

लग्नतिथी कोरडीच

जूनच्या ३० तारखेपर्यंत विवाह मुहूर्त होते. या काळात सार्वजनिक सोहळ्यांना परवानगीच नसल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छोट्या स्वरूपात विवाह झाले. विवाहासाठी मोठ्या प्रमाणावर गुलाबपुष्पाला मागणी असते. परंतु अवघ्या पाचपन्नास नातलगांच्या उपस्थितीत विवाह पार पडल्याने त्याचाही प्रतिकूल परिणाम फुल व्यवसायावर झाला.

व्रतवैकल्यांवर फुलीच

श्रावणात अनेक ज्येष्ठांकडून विविध व्रते केली जातात. अनेक जण या महिन्यात भगवान शंकराला बेलाची पाने अर्पण करतात. त्यासाठी बेलाच्या पानांना मोठी मागणी असते. सर्वच शिवालये बंद असल्याने बेलाच्या पानांनाही मागणी नाही. पुढील महिन्याच्या २२ तारखेला गणरायाचे आगमन होईल, याकाळात जास्वंदच्या फुलांना मोठी मागणी असते. यंदा सार्वजनिक समारंभांवर निर्बंध आल्याने जास्वंदाच्या मागणीतही मोठी घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय नवरात्रात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. निर्बंधामुळे झेंडूच्या मागणीतही मोठी घट होण्याची शक्यता आहे.

पंचवटीतील सर्व मंदिरे चार महिन्यांपासून बंदच आहेत. त्याचा परिणाम फुल विक्रीवर झाला असून, विक्रीत मोठी घट झाली आहे. - भारती बचके, फुलविक्रेती 

सर्व प्रकारच्या गुलाबपुष्पांची विक्री करतो. मात्र श्रावण असूनही फुलांना मागणी नाही. दसरा, दिवाळीही कोरडीच जाण्याची चिन्हे आहेत. - गणेश जगताप, फुलविक्रेता

(संपादन - किशोरी वाघ)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com