बरे झालेल्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक! सद्यःस्‍थितीत नऊ हजार २७२ बाधित

अरुण मलाणी
Tuesday, 22 September 2020

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. सोमवारी (ता. २१) दिवसभरात एक हजार ६१ नवीन बाधित आढळून आले, तर चौदाशे रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, सतरा रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांपेक्षा बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या अधिक राहिली. सोमवारी (ता. २१) दिवसभरात एक हजार ६१ नवीन बाधित आढळून आले, तर चौदाशे रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. दरम्यान, सतरा रुग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्‍थितीत नऊ हजार २७२ बाधित उपचार घेत आहेत. 

बरे झालेल्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक 
सोमवारी नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ५९५, नाशिक ग्रामीणचे ४२९, मालेगावचे २९, तर जिल्‍हाबाह्य आठ रुग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍यांमध्ये नाशिक शहरातील एक हजार १३७, नाशिक ग्रामीणचे २३७, मालेगावचे २३, तर जिल्‍हाबाह्य तीन रुग्‍ण आहेत. दिवसभरात नाशिक शहरातील आठ, नाशिक ग्रामीणचे सहा, मालेगाव महापालिका हद्दीतील दोन आणि जिल्‍हाबाह्य एका रुग्‍णाचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून आतापर्यंतच्‍या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५ हजार ६३ झाली आहे, तर ५४ हजार ६०१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार १९० बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्‍थितीत नऊ हजार २७२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दिवसभरात आढळले एक हजार ६१ बाधित, 

दरम्‍यान, दिवसभरात नाशिक शहरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार ५८८ संशयित, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २५०, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २२, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २०, जिल्‍हा रुग्‍णालयात सहा संशयित दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत एक हजार ५९५ अहवाल प्रलंबित होते. यापैकी एक हजार ५४ अहवाल नाशिक ग्रामीणचे आहेत. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

आवश्यक सुविधा नसल्याने नगरसूलला दोन दिवसांत दोन मृत्यू 
नगरसूल : येथील ग्रामीण रुग्णालयात निर्माण करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये अत्यावश्‍यक सुविधा नसल्याने गेल्या दोन दिवसांत दोन जणांचा बळी गेला आहे. सध्या येथे २५ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, गंभीर रुग्णांंवर उपचार करण्यासाठी येथे यंत्रणा उपलब्ध नाही. व्हेंटिलेटर, अन्य अत्यावश्यक सुविधा, तसेच वेगवेगळ्या आजारांवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरही येथे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अत्यवस्थ कोविड रुग्णांंना नाशिकला जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येते. मात्र, सद्यःस्थितीत जिल्हा रुग्णालयात व मालेगावलाही बेड मिळणे अशक्यप्राय झालेले आहे. अशा पार्श्‍वभूमीवर रविवारी येथील ४० वर्षीय रुग्णाचा व सोमवारी पुन्हा येवल्यातील ४८ वर्षीय रुग्णाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील अत्यवस्थ रुग्णांंसाठी बेड वाढविण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

मालेगावला कोरोनाबळी दीडशेच्या उंबरठ्यावर 
मालेगाव : शहरातील दोघा कोरोनाबाधितांचा सोमवारी मृत्यू झाला. येथील कोरोनाबळींची संख्या दीडशेच्या उंबरठ्यावर पोचली असून, शहरात आजवर १४८, तर तालुक्यात ४३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये कजवाडे व शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, नव्याने ४९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, तर २० जणांना घरी सोडून देण्यात आले. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरसह विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २६० आहे. एकूण ४३५ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. आठ रुग्णांना आज अन्यत्र हलविण्यात आले. शहरातील आतापर्यंत दोन हजार ७४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज नव्याने ११२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. २०० अहवाल प्रलंबित आहेत.  

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: number of recovered patients increased for the third day nashik marathi news