जेव्हा खरा मास्टरमाइंड सापडतो पोलिसांच्या जाळ्यात; जबरी घटनेचा धक्कादायक खुलासा

arrested.jpg
arrested.jpg

नाशिक : जबरी लुटीतील वाहनासह मद्यसाठा पोलिसांचा हाती लागला असून, त्यात ट्रकमालकच मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे. सराईत गुन्हेगारांच्या मदतीने चालकास गाफील ठेवत मालकानेच मालेगाव-मनमाड मार्गावरील वऱ्हाणेपाडा येथील एका बंदिस्त घरात ठेवलेला मद्याचा साठा आणि गावठी पिस्तूल शोधण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे शोध विभागाला यश आले आहे. मास्टरमाइंड पोलिसांनी जेरबंद केला असला, तरी त्याचे साथीदार मात्र पसार झाले आहेत. शहर पोलिसांच्या गुन्हे शोध विभागाच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली. 
 
असा आहे प्रकार

मंदार हरी कुलकर्णी (वय ३९, रा. हरिपुष्प बंगला, साईनाथनगर) असे अटक केलेल्या पिस्तूलधारी ट्रकमालकाचे नाव आहे. गेल्या सोमवारी (ता. १८) रात्री इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात जगदीश संपत बोरकर (३७, रा. राजवाडा, विल्होळी) दिंडोरी तालुक्यातील सिग्राम-पेरनॉड रिकॉर्ड इंडिया लि. या कारखान्यातून आयशर ट्रक (एमएच ४८, बीएम १६१०)मध्ये मद्यसाठा भरून पनवेल (मुंबई) येथे पोचविण्यासाठी निघाले होते. तत्पूर्वी ते प्रवासखर्चासाठी मालकाची वाट बघत इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे थांबले होते. त्या वेळी चार जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने वाहनाचा ताबा घेत व चालकास मारहाण करीत चालकाच्या केबिनमध्ये डांबून ठेवले व ट्रक महामार्गावरून पळवून नेला. पुढे उमराणे शिवारात चालक बोरकर यांना बेदम मारहाण करीत खाली उतरवून देत मद्यसाठा घेऊन पसार झाले होते. 

दीड कोटीची लूट 

आयशर ट्रकमध्ये एक कोटी ४३ लाख ३८ हजार ६१० रुपये किमतीचा मद्यसाठा होता. या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार किरण साळुंकेचा हात असल्याची माहिती युनिट एकच्या पथकास मिळाली होती. त्यावरून पोलिस त्याचा मालेगाव-मनमाड मार्गावर शोध घेत असताना साईसेवा सैनी ढाब्यासमोर लुटीतील वर्णनाचा ट्रक बेवारस स्थितीत आढळला. पोलिसांनी निरीक्षण केले असता लुटारूंनी पळवून नेलेल्या ट्रक (एमएच १७, एजी ६३६३)ला हा क्रमांक रेडियमने चिटकविल्याचे पुढे आले. वरिष्ठांना कळवून पथक साळुंकेच्या शोधात निघाले असता वऱ्हाणेपाडा येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या घराजवळ कारमधून संशयितासह टोळक्याने धूम ठोकली. 

जबरी लुटीतील वाहनासह साठा जप्त 

पोलिसांनी घराची झडती घेतली असता, तेथे मद्यसाठा मिळाला. ट्रकसह मद्यसाठा पोलिसांनी हस्तगत केला असून, मुद्देमाल मुंबई नाका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. दरम्यान, साईनाथनगर चौफुली भागात एकाकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी धाव घेत संशयित कुलकर्णी यास ताब्यात घेतले असता, त्याच्याकडे गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिस तपासात तोच लूटमारीतील ट्रकचा मालक असल्याचे पुढे आले असून, त्यानेच चालकास गाफील ठेवत लूटमार घडवून आणल्याची कबुली दिल्याची माहिती उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली. 

ही कारवाई सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर व युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी, दिनेश खैरनार, उपनिरीक्षक निवृत्ती सरोदे, जमादार काळू बेंडकुळे, विजय गवांदे, यवाजी महाले, रवींद्र बागूल, संजय मुळक, वसंत पांडव, अनिल दिघोळे, प्रवीण कोकाटे, नाझीम पठाण, विशाल काठे, फय्याज सय्यद, आसीफ तांबोळी, दिलीप मोंढे, मोतीराम चव्हाण, योगिराज गायकवाड, महेश साळुंके, प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, मोहन देशमुख, शांताराम महाले, रावजी मगर, राजेश लोखंडे, विशाल देवरे, प्रवी चव्हाण, गणेश वडजे, राम बर्डे, राहुल पालखेडे, नीलेश भोईर, समाधान पवार, गौरव खांडरे, प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.  


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com