पेट्रोलपंपाजवळ भीषण अपघात; ट्रॅक्टर-कारच्या धडकेत एक ठार, सहा जखमी 

योगेश सोनवणे
Tuesday, 29 September 2020

कांदा भरलेला ट्रॅक्टर रात्री सटाण्याकडून येत होता, तर कार देवळ्याहून सटाण्याकडे जाताना चालकाला अंदाज न आल्याने आहेर वस्तीनजीकच्या एस्सार पेट्रोलपंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

नाशिक / देवळा : कांदा भरलेला ट्रॅक्टर रात्री सटाण्याकडून येत होता, तर कार देवळ्याहून सटाण्याकडे जाताना चालकाला अंदाज न आल्याने आहेर वस्तीनजीकच्या एस्सार पेट्रोलपंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली.

पेट्रोलपंपाजवळ भीषण अपघात

येथील देवळा-सटाणा रस्त्यावर एस्सार पेट्रोलपंपाजवळ रविवारी (ता. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रॅक्टर व अल्टो कार यांच्यात भीषण अपघात होऊन एकजण जागीच ठार, तर इतर सहा जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरचे मोठे चाक निखळून पडले. रविवारी (ता. २७) रात्री कांदा भरलेला ट्रॅक्टर (एमएच ४१, एए ७२५६) सटाण्याकडून येत होता, तर कार (एमएच ४१, एएस ६४६७) देवळ्याहून सटाण्याकडे जाताना चालकाला अंदाज न आल्याने आहेर वस्तीनजीकच्या एस्सार पेट्रोलपंपाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात कारचालक सुभाष हनुमान देवरे (वय ४२, रा. गुंजाळनगर, ता. देवळा) यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

एक ठार, सहा जखमी 

ट्रॅक्टरवरील शिवाजी गावित, लक्ष्मण चौरे, धर्मराज कुवर (सर्व रा. भिलवाडा, मांगीतुंगी, ता. बागलाण), तसेच गुंजाळनगर येथील रत्ना गुंजाळ, राधाबाई देवरे, सुनील गुंजाळ हे सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर मालेगाव व नाशिक येथे उपचार सुरू आहेत. या मार्गावर खड्डे असल्याने ते टाळण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in a tractor car accident nashik marathi news