दिवाळीच्या तोंडावर कांद्याचे दिवसाचे ४० कोटींचे लिलाव ठप्प; केंद्राच्या साठवणूक मर्यादेचे पडसाद  

onion price 3.jpg
onion price 3.jpg

नाशिक : दक्षिणेतील कांद्याचे पावसाने नुकसान केल्याने देशांतर्गत ग्राहकांपुढे नाशिकच्या कांद्याखेरीज पर्याय उरलेला नव्हता. त्यामुळे निर्यातबंदीचा निर्णय करूनही भावात फारसा फरक पडला नसल्याने केंद्र सरकारने साठवणुकीवर निर्बंध घातले. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर कांद्याच्या आगारात दिवसाला आवक होणाऱ्या ८० हजार क्विंटल कांद्याच्या लिलावातून होणारी ४० कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. एवढेच नव्हे, तर व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने क्विंटलला दोन ते तीन हजार रुपयांनी भावात घसरण झाली. 

केंद्राच्या साठवणूक मर्यादेचे पडसाद 
‘सकाळ’च्या जिल्हाभरातील बातमीदारांनी कांद्याच्या लिलावाची माहिती घेतली. त्यातून हे चित्र पुढे आले. कांदा व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष नंदकुमार डागा यांनी साठवणुकीच्या मर्यादेमुळे जागेचा प्रश्‍न तयार झाल्याचे स्पष्ट केले, तसेच कांद्याचे लिलाव बाजार समित्या करू शकतील, त्या लिलावात कांदा विकत घेण्यास इच्छुक व्यापारी सहभागी होऊ शकतील, असेही श्री. डागा यांनी सांगितले. दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला नसल्याने लिलाव झाला नसल्याचे स्पष्टीकरण बाजार समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टन आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी २५ टनांच्या साठवणुकीचे निर्बंध केंद्र सरकारने लागू केले आहेत. खरे म्हणजे, हे पहिल्यांदा घडते असे नाही. निर्यातबंदी, साठवणूक मर्यादा आणि प्राप्तिकर विभागाचे छापे हे पूर्वीप्रमाणे आताही ‘रिपीट’ झाले आहेत.

भावात दोन ते तीन हजारांची घसरण;

निर्बंध लागू करण्याअगोदर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याचा क्विंटलचा सरासरी भाव पाच ते सहा हजार रुपयांपर्यंत पोचला होता. नव्याने दाखल झालेल्या पोळ तथा लाल कांद्याला चांगले भाव मिळू लागले होते. सहकार विभागाच्या माहितीनुसार नाशिक, सिन्नर, मनमाडचा अपवाद वगळता जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव झाले नाहीत. प्रत्यक्षात मनमाडमधील लिलावात मात्र व्यापारी सहभागी झाले नव्हते. उन्हाळ आणि नवीन अशा एकूण अडीच हजार क्विंटल कांद्याची दिवसभरात येथे विक्री होते. मनमाडमध्ये भावात क्विंटलला दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे. नाशिकमध्ये क्विंटलभर कांद्याला सरासरी साडेचार हजार रुपयांचा भाव मिळाला. सिन्नरमध्ये कांद्याची आवक झाली नाही. मात्र, नांदूरशिंगोटेमध्ये ४०० आणि नायगावमध्ये ७० क्विंटल कांद्याची विक्री झाली. या कांद्याला सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत अडीच हजार रुपयांची भावात घसरण झाली. 

हेही वाचा > पतीनेच चोरीचा बनाव करत गरोदर पत्नीला संपविले; सासऱ्याची जावयाविरुध्द तक्रार
बाजार समितीनिहाय 
लिलाव बंदची स्थिती 

चांदवड : आठ हजार क्विंटलची आवक होते. दोन दिवस लिलाव होणार नाहीत. दोन हजारांनी भावात घसरण. 
उमराणे : दहा हजार क्विंटल उन्हाळ आणि ५०० क्विंटल नवीन कांद्याची आवक होते. 
देवळा : आवक नाही. साडेतीन हजार क्विंटलची आवक होते. 
कळवण : नऊ हजार क्विंटलची आवक होते. दोन हजार ते बावीसशे रुपयांनी भावात घसरण. 
अभोणा उपबाजार : आज आणि उद्याही बंद. चार हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होते. एक ते दीड हजाराने भावात घसरण. 
पिंपळगाव बसवंत : साडेतीन हजार क्विंटल उन्हाळ आणि ३०० क्विंटल नवीन कांद्याची आवक होते. 
सटाणा : साडेसहा हजार ते सात हजार क्विंटल कांद्याची आवक होते. अडीच ते तीन हजार रुपयांनी भावात घसरण. 
नामपूर : नऊ हजार क्विंटल कांद्याची दिवसभरात होते आवक. 
लासलगाव : कांद्याची आवक नाही. अकराशे ते दीड हजार रुपयांनी घसरण. 
मुंगसे : सात हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होते. 
झोडगे उपबाजार : सहाशे क्विंटल कांद्याची आवक होते. दोन हजार रुपयांनी भाव घसरले. 

येवला : मजूर सुटीमुळे लिलाव बंद. मंगळवारी आठवडा बाजारामुळे सुटी. चार हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होते. सातशे रुपयांनी भाव घसरले. 

कांदा लिलाव होऊ न शकल्याने शेतकऱ्यांना सणासुदीच्या तोंडावर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव मंगळवार (ता. २७)पासून सुरू करावेत. ही मागणी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांची भेट घेऊन करण्यात आली आहे. -भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना 

कांदाविषयक धोरणांमुळे केंद्र सरकारचा बुरखा फाटून बेगडी चेहरा समोर येतोय. निर्यातबंदी, प्राप्तिकर विभागाच्या धाडी, दिल्लीत बोलावून व्यापाऱ्यांना धमकावणे आणि आता साठवणुकीचे निर्बंध घालण्यात आले. मुळातच, कांदा जीवनाश्‍यक वस्तूंमधून वगळल्याचा कायदा केल्याचा कांगावा केला. आता कायदा मोडण्यासाठी केंद्र सरकार रोज नवी खेळी करत आहे. त्यातून शेतकऱ्यांचे नुकसान होते. हे टाळण्यासाठी केंद्र सरकार भानावर आले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. -हंसराज वडघुले-पाटील, शेतकरी संघटना नेते  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com