कांदा रोपावर मर, करपा रोगांचा प्रादुर्भाव; कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले

प्रकाश बिरारी
Thursday, 1 October 2020

कांद्याचे आगर समजल्या जाणाऱ्या कंधाणे (ता. बागलाण) परिसरात सध्याच्या ढगाळ व बदलत्या वातावरणामुळे उन्हाळ कांदा रोपांवर मर व करपा रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपे पिवळी पडून कुजत असून, त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी विविध महागड्या औषधांची फवारणी करत आहेत.

कंधाणे(जि.नाशिक) : कांद्याचे आगर समजल्या जाणाऱ्या कंधाणे (ता. बागलाण) परिसरात सध्याच्या ढगाळ व बदलत्या वातावरणामुळे उन्हाळ कांदा रोपांवर मर व करपा रोगांच्या प्रादुर्भावामुळे रोपे पिवळी पडून कुजत असून, त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी विविध महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. यातच परतीच्या पावसामुळे नुकसान होण्याच्या भीतीमुळे दुबार बी पेरणीने कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. 

दुहेरी संकटात शेतकरी
गेल्या वर्षी अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानामुळे पुरेशा प्रमाणात उन्हाळ कांदा बीजोत्पादन झाले नाही. परिणामी, कांदा बियाण्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद बी दर गगनाला भिडले. यातही मिळेल तेथून बी खरेदी करत उत्पादकांनी लागवड केली. मात्र, कधी ढगाळ वातावरण, तर कधी सकाळी धुके व भरपूर प्रमाणात दव पडत असल्याने कांदा रोपे अग्रभागी पिवळी पडून मर रोगाचा प्रादुर्भाव वाढून कांद्याची रोपे कुजून मरू लागली आहेत. यातच कांदा पिकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता, रोपांअभावी कांदा लागवडीची अनिश्चितता व मोठा भांडवली खर्च वाया जाण्याची भीती अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. 

हेही वाचा > विवाहितेच्या मृत्यूनंतर माहेरच्यांकडून जावयाच्या घरासमोरच अंत्यसंस्कार; दिंडोरी तालुक्यातील घटना

परिसरातील शेतकरी पावसाळ्यापूर्वी शेतातील कांदा सुरक्षितपणे चाळीत साठवण करण्याच्या दृष्टीने नियोजन करीत असतात. परंतु चालू वर्षी रोपांचे नुकसान व लांबलेल्या पावसामुळे उन्हाळ कांदा पिकाचे नियोजन अवघड झाले आहे. -प्रमोद बिरारी, कांदा उत्पादक शेतकरी, कंधाणे 

कांदा बी टंचाईमुळे खासगी सीडस कंपनी व बियाणे विक्रेत्यांनी भरमसाठ दराने विक्री केली आहे. त्यामुळे आता शासनाने बियाणे महामंडळांकडून शेतकऱ्यांना अल्प दरात बी उपलब्ध करून द्यावे. -बाळासाहेब बिरारी, माजी संचालक वसाका 

हेही वाचा >  मन हेलावणारी घटना! मरणही एकत्रच अनुभवण्याचा मायलेकांचा निर्णय; घटनेने परिसरात खळबळ

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: onion seedlings diseases nashik marathi news