'३८ गाव पाणीपुरवठा योजना' देशातील एकमेव नफ्यातील योजना; इतरांसाठी ठरली रोल मॉडेल

only profitable water supply scheme in the country nahik marathi news
only profitable water supply scheme in the country nahik marathi news

नाशिक/ विखरणी :  कारभारी, देखभाल, दुरुस्तीअभावी जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडून असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, शासनाच्या निधीशिवाय लोकसहभागातून व्यवस्थापन समितीमार्फत नफ्यात चालणारी येथील ३८ गाव नळपाणी पुरवठा योजनेचे कामकाज अफलातून ठरले आहे. विशेष म्हणजे, जागतिक बँकेने गौरवलेली ही योजना इतरांसाठी रोल मॉडेल झाली आहे. 

२०१० पासून ३८ गावांना पाणीपुरवठा

युती शासनाच्या काळात मंजूर होऊन अर्धवट काम होताच काम बंद पडलेली ही योजना होण्याबाबत साशंकता होती. मात्र, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे येवल्याला नेतृत्व लाभले अन् काही वर्षांतच कामाला गती मिळाली व काम पूर्णही झाले. २०१० पासून योजनेद्वारे ३८ गावांना पाणीपुरवठा सुरू झाला तो आजतागायत अखंडपणे सुरू आहे. 
२०३१ मध्ये गावाची लोकसंख्या एक लाख ४२ हजार गृहीत धरली असून, दरडोई ५५ लिटर्स पाणी दिले जाते. २०१२ पासून व्यवस्थापन समितीमार्फत सुरळीतपणे कामकाज सुरू असल्याने आज योजनेची व्याप्ती ५९ गावे झाली आहे. नगरसूल व अंकाई किल्ला रेल्वेस्थानकाला देखील योजना पाणी देते.

जागतिक बँकेकडून गौरव 

जागतिक बँकेने केलेल्या सर्व्हेमध्ये शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय नफ्यात चालणारी भारतातील नंबर एकची ही योजना ठरली आहे. याचमुळे आंध्र व तेलंगणा राज्यातील समितीकडून योजनेचा अभ्यास दौरा केला होता. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांच्या सूक्ष्म नियोजनातून उत्तम घुले व ३५ कर्मचारी जबाबदारी सांभाळत आहेत. योजनेंतर्गत रोज २५ ते २७ लाख लिटर पाणी फिल्टर केले जाते. 
 
कोरोना काळात मोठे योगदान 

योजनेचे कर्मचारी ५९ गावांत सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी जीव धोक्यात टाकून काळजी घेत फिरत होते. उन्हाळा असतानाही संपूर्ण लॉकडाउनमध्ये योजना सुरळीत ठेवण्याचे काम पाणीपुरवठा समितीने केले. लॉकडाउन, मंदावलेल आर्थिक चक्र, कोरोनाच्या स्थितीमुळे बदललेलं जीवन जगण्याच गणित, त्यामुळे अनेक गावांची थकलेली पाणीपट्टी, कामगारांचे पगार, पाणी शुद्धीकरणासाठी लागणारी सामग्रीचा तुटवडा या सर्व समस्या समोर उभ्या असतानाही यातून मार्ग काढत अखंडपणे ३८ गाव योजना सुरू राहिली ती योजनेच्या समितीच्या नियोजनामुळे. योजनेतून कोरोना काळात बाभूळगाव येथील आदिवासी मुलांचे वसतिगृहात सुरू असलेल्या कोविड सेंटरला पाणीपुरवठा करून खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अंगणगाव येथील पोलिस वसाहतीत पाणीटंचाई असते. कोरोना काळात तर पोलिसांना पाणी मिळणे अवघड झाल्याने योजनेचे पाणी त्यांना देण्यात आले. कोरोना संकट अन् उन्हाळा असल्याने योजनेची जबाबदारी वाढली होती. श्री. भुजबळ यांचे योजनेवर विशेष लक्ष होते. 

बिसलरीसारखे पाणी देणारी योजना, अशी सुरवातीपासून ओळख आहे. इतर योजनांसारखा सावळागोंधळ होऊ न देता आम्ही शिस्तीने काम केले म्हणून नफ्यात चालणारी योजना म्हणून गौरव होतोय. नियोजन व व्यवस्थापनामुळे अनेक गावांना कायमचे टँकरमुक्त करत योजना आज ५९ गावांची तहान भागवत आहे. 
-सचिन कळमकर, अध्यक्ष- ३८ गाव पाणीपुरवठा योजना समिती 


जाहिरात, प्रवासभत्ता, मानधन यावर दहा वर्षांत एक रुपयादेखील खर्च केलेला नाही. नियम लावले व ते पाळल्यामुळेच ही योजना आज आदर्श म्हणून उभी आहे. 
-मोहन शेलार, उपाध्यक्ष- ३८ गाव पाणीपुरवठा योजना समिती 
 

संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com