सावधान! भीषण जलसंकटाची चाहूल; आतापासूनच काटकसरीने करा पाण्याचा वापर

The onset of severe water crisis nashik marathi news
The onset of severe water crisis nashik marathi news

नाशिक : ऐन पावसाळ्यात वरुणराजाने ओढ दिल्याने शहर आणि जिल्ह्याला भीषण जलसंकटाची चाहूल लागली आहे. जिल्ह्यातील मध्यम आणि मोठ्या २४ प्रकल्पांची क्षमता ६५ हजार ८१८ दशलक्ष घनफूट असून, सद्यःस्थितीत ३३ हजार ६८४ म्हणजेच, ५१ टक्के साठा झाला आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या मध्यापर्यंत धरणांत ८५ टक्के साठा होता. त्यामुळे आतापासूनच काटकसरीने पाण्याचा वापर करावा लागणार आहे. शिवाय पावसाने आतापर्यंत दोनदा मोठा खंड दिल्याने खरिपातील पिकांच्या उत्पादनाला ५०० कोटींचा दणका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात निम्मे नुकसान आदिवासी भागातील भाताचे असेल.

नाशिकच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाला सुरवात झाली आहे. मात्र, तो किती टिकतो, यावर पाण्याची उपलब्धता अवलंबून आहे. त्याच्या आधारे वर्षभर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार की नाही, याचा आराखडा १५ ऑक्टोबरच्या आसपास तयार होईल. सद्यःस्थितीत नाशिककरांबरोबरच औद्योगिक वसाहत, एकलहरेच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या गंगापूर धरणसमूहात आतापर्यंत ४८ टक्के साठा झाला आहे. म्हणजेच, बिगरसिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज उपलब्ध जलसाठ्यातून पूर्ण करणे सद्यःस्थितीत शक्य नाही. त्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता अधांतरी आहे. दारणा समूहातून नाशिकसह गोंदे औद्योगिक, कोपरगाव, वैजापूर, लासलगाव आणि परिसरातील गावे, शिर्डी, राहता, पुणतांबा व ग्रामपंचायती, साखर कारखान्यांसाठी पाणी उपलब्ध होते. वैजापूर-गंगापूरसाठीच्या एक्स्प्रेस कालव्यासाठी मुकणे धरणात चार हजार ३०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण अवलंबून आहे. प्रत्यक्षात मुकणेत तीन हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध झाले आहे. दारणा समूहात ७० टक्के पाणी उपलब्ध असले, तरीही समूहाची पूर्ण गरज भागवण्याची स्थिती आतापर्यंत तयार झालेली नाही. पिंपळगाव, ओझर, एचएएल, मनमाड, रेल्वे, येवला, दिंडोरी, चांदवड आणि उद्योग यासाठीच्या उर्ध्व गोदावरी प्रकल्पांमध्ये २६ टक्के साठा झाला आहे. या समूहातील सिंचन, बिगरसिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण क्षमतेच्या तुलनेत अधिक दिसते. कारण खरिपामध्ये सिंचनासाठी अधिक वापर केला जातो.

दारणामधून दहा हजार क्युसेक विसर्ग
दाभाडी-मालेगाव, बागलाण, देवळ्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या चणकापूर धरणात ३५ टक्के साठा झाला आहे. तसेच सिन्नर आणि वडांगळी भागातील गावांसाठीच्या कडवा धरणात साठा ५१ टक्के आहे. कडवामधून खरिपासाठी पाणी दिले जाते. दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक नऊ हजार ९५६ क्युसेक विसर्ग दारणा धरणातून सुरू आहे. त्याखालोखाल भावली धरण भरल्याने ७०१, नांदूरमध्यमेश्वरमधून सहा हजार ३१०, हरणबारीमधून ८४६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षी ऑगस्टच्या मध्याला आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही धरणे फुल झाली होती. आता मात्र भावली, हरणबारी, माणिकपुंज ही धरणेच शंभर टक्के भरली आहेत. मध्यंतरी ‘सकाळ’ने निसर्ग चक्रीवादळाच्या पट्ट्यात पावसाने दिलेल्या उघडीपीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार जलसंपदा विभागातर्फे शहरे आणि गावांना काटकसरीने पाणी वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.

भात उत्पादकतेत ३५ टक्क्यांची घट
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र सहा लाख ६५ हजार ५८२ हेक्टर आहे. त्यापैकी पाच लाख ६४ हजारांहून अधिक म्हणजेच ८५ टक्के क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत. मात्र पावसाने दडी मारल्याने भाताच्या उत्पादकतेत ३५ टक्क्यांनी घट ठरलेली आहे. ५५ हजार ८५० हेक्टरवर आतापर्यंत भाताच्या रोपांची पुनर्लागवड झाली आहे. पाऊस नसल्याने रोपे एक महिन्याहून अधिक कालावधीची झाल्याने हा फटका आदिवासी शेतकऱ्यांना २२५ कोटींच्या आसपास जाणार आहे. त्याचप्रमाणे नागलीला २५ टक्के दणका बसण्याची शक्यता असून, आदिवासींच्या नुकसानीत सहा कोटींची भर पडणार आहे. मुगाची पेरणी ३१ टक्के झाली असून, फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पीक आहे. ६९ टक्के क्षेत्रावर उडीदची पेरणी झाली आहे. शेंगा लागण्याच्या, पक्वतेच्या अवस्थेत उडीद आहे. ७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली बाजरी पोटरीच्या, कणीस लागण्याच्या अवस्थेत आहे. मक्याची पेरणी १०७ टक्के क्षेत्रावर झाली आहे. वाढीच्या, तुरे आणि कणीस निघण्याच्या अवस्थेत मका पोचला आहे. १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेला सोयाबीन फुलो, शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. १०० टक्के लागवड झालेला भुईमूग वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. ९५ टक्के कापसाची लागवड झाली आहे. वाढ, फुले, पाते, बोंडे लागण्याच्या अवस्थेत कापूस आहे.

धरणसमूहातील जलसाठ्याची उपलब्धता
(आकडे दशलक्ष घनफूटामध्ये)
धरणसमूह क्षमता वार्षिक अपेक्षित वापर आतापर्यंत उपलब्ध जलसाठा
(समाविष्ट धरणे) पिण्यासाठी व उद्योग शेतीसाठी
गंगापूर ९ हजार ३५० ६ हजार ५०० २ हजार १०० ४ हजार ५२९
(गंगापूर, गौतमी गोदावरी
आणि कश्‍यपी)
दारणा १६ हजार ९५५ ५ हजार ९०० ७ हजार ९०० ११ हजार ९०५
(दारणा, वालदेवी, मुकणे
आणि भावली)
उर्ध्व गोदावरी प्रकल्प ११ हजार ५३१ ५ हजार ९०० ८ हजार ३ हजार ९६
(करंजवण, वाघाड, ओझरखेड,
पुणेगाव, तिसगाव, पालखेड)
चणकापूर २ हजार ४२७ २ हजार १०० २६० ८४१
कडवा १ हजार ६८८ १ हजार १ हजार ६५० ८६०

खरीप पिकांच्या नुकसानीचा अंदाज
० मका (लष्करी अळीचा प्रादुर्भाव आणि कोरडवाहूचे नुकसान) ः ८२ कोटी
० बाजरी (फुलोऱ्याच्या अवस्थेत दाणे भरण्यासाठी आवश्‍यक पावसाची गरज- २५ टक्के नुकसान) ः ४८ कोटी
० मूग (शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाणी नसलेल्यांचे नुकसान) ः २६ कोटी
० उडीद (७० ते ८० दिवसाचे पीक) ः ११ कोटी
० भुईमूग (आऱ्या जमिनीत जाण्याच्या अवस्थेत) ः ३५ कोटी
० सोयाबीन (वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्‍न) ः ५६ कोटी
(पिकांच्या अवस्थानिहाय पाऊस न झाल्याने उत्पादकतेत येणारी हेक्टरनिहाय घट आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान मूल्यदराच्या आधारे नुकसानीची आकडेवारीचा अंदाज बांधण्यात आला आहे.)

चाळीतील कांद्याला भावाची शक्यता
पावसाने चांगली हजेरी न लावल्यास उन्हाळ कांद्याचे, गहू, उसाचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढेच नव्हे, तर पावसाने शेतकऱ्यांच्या पोळ कांद्याच्या रोपांचे नुकसान केले आहे. ही सारी परिस्थिती पाहता, अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कांद्याची चणचण भासू शकेल. पर्यायाने चाळीत साठवलेल्या कांद्याला क्विंटलला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी पावसाच्या हजेरीवर साठवलेल्या उन्हाळ कांद्याला चांगला भाव अवलंबून असल्याचे निर्यातदारांनी स्पष्ट केले होते. हे सारे अंदाज पाहता, शेतकऱ्यांनी साठवलेल्या कांद्याचा ‘पॅनिक सेल’ करू नये, असा सल्ला बाजारपेठेचे अभ्यासक देताहेत.
 

(संपादन : ब्रिजकुमार परिहार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com