
शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये एक लाख ४५ हजार ८२८ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रियेच्या आतापर्यंत चार ऑनलाइन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीही पूर्ण झाली आहे. यात अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
येवला (नाशिक) : विद्यार्थ्यांच्या पसंतीमुळे गुणवतेनुसार प्रवेश देण्याची वेळ आलेल्या आयटीआय अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला यंदा अल्प प्रतिसाद मिळत आहे. खूपच कमी विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले असून, दर वर्षीच्या तुलनेत यंदा १५ ते २० टक्के प्रवेश कमी झाले आहेत. आता शाशकीय आयटीआय शिल्लक जागावरील प्रवेशासाठी ४ तारखेपर्यंत संस्था स्तरावर समुपदेशन फेरीचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एक लाख ४५ हजार ८२८ जागा उपलब्ध
आयटीआयची प्रवेशप्रक्रिया व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येत आहे. यंदा कोरोना व आरक्षणाच्या निर्णयामुळे पेच निर्माण झाल्याने प्रवेशप्रक्रियेवर परिणाम झाला आहे. मराठा आरक्षणाचा पेच सुटल्यानंतर प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली. राज्यातील ३५८ तालुक्यांत १४७ शासकीय आयटीआय कार्यरत असून, त्यांची प्रवेशक्षमता ९२ हजार ५५६ आहे. तसेच ५६९ खासगी आयटीआय असून, त्यांची प्रवेशक्षमता ५३ हजार २७२ आहे. शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये एक लाख ४५ हजार ८२८ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रियेच्या आतापर्यंत चार ऑनलाइन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीही पूर्ण झाली आहे. यात अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
अजूनही इच्छुकांना आयटीआयसाठी प्रवेशाची संधी
तरीही जागा रिक्त असल्याने आता संस्था (आयटीआय) स्तरावर समुपदेशन फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. अजूनही इच्छुकांना आयटीआयसाठी प्रवेश घेण्याची संधी आहे. १ ते ४ जानेवारी या काळात www.admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. येथील बाभूळगाव शासकीय आयटीआयमध्ये व्यवसाय प्रवेशाकरिता अजूनही ५७ जागा शिल्लक आहेत. यामध्ये इलेक्ट्रिशियन - २, ड्राफ्ट्समन सिव्हिल- १३, सर्वेअर - १०, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक- ४, बेसिक कॉस्मेटोलॉजी- ९, वेल्डर- ७, डिझेल मेकॅनिक- १ व कोपा- ११ या जागांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रतीक्षेतील किंवा वंचित विद्यार्थ्यांना ही मोठी संधी असून, रिक्त जागा राहिल्याने प्रवेश मिळू शकणार आहे.
हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष
रिक्त जागा भरण्यासाठी संस्थास्तरावर समुपदेशन फेरी होणार आहे. ४ तारखेपर्यंत विद्यार्थी या संकेतस्थळावर आपल्या प्रवेश खात्यात लॉगिन करून आयटीआय येवला या संस्थेची समुपदेशन फेरीसाठी निवड करून नोंदणी करावी, तसेच प्रत्यक्ष प्रवेशाकरिता मोबाईलवर आलेल्या संदेशाप्रमाणे समुपदेशन फेरीसाठी मूळ कागदपत्रांसह ६ व ७ तारखेला उपस्थित राहावे. -राहुल देशमुख, प्राचार्य, शासकीय आयटीआय, येवला
आतापर्यंत झालेले प्रवेश
- पहिली फेरी - ८८ हजार विद्यार्थ्यांपैकी २६ हजार ८८१ प्रवेश
- दुसरी फेरी - ७२ हजार ७३३ विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ६७३ प्रवेश
- तिसरी फेरी - ६३ हजार ८२० विद्यार्थ्यांपैकी १३ हजार ३३२ प्रवेश
-मागील वर्षी सर्व फेऱ्यांअंती एक लाख २० हजार प्रवेश झाले आहेत.