'ऑक्सिजनचा कोटा रुग्णांसाठीच! उद्योग नायट्रोजनवर चालवावेत', कोण म्हणालं वाचा

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 16 September 2020

उद्योगांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून तो कोरोना रुग्नांसाठी रुग्णालयांना द्यावा, अशा प्रकारचे शासनाचे पत्र उद्योग संघटनांना प्राप्त झाल्याने व उद्योजकांमध्ये चिंता वाढल्याने आयामांच्या शिष्टमंडळाने या प्रश्नावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांची भेट घेऊन संबंधित प्रश्नावर चर्चा केली.

नाशिक/सिडको : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांसाठी ऑक्सिजनचा कोटा राखीव ठेवण्यात आला असून, शासनाच्या आदेशाचे पालन करत उद्योजकांनी आपले उद्योग ऑक्सिजनऐवजी नायट्रोजनवर चालवावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी उद्योजकांना केले आहे. आयमा संघटनेतर्फे बुधवारी (ता. १६) श्री. भामरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. ऑक्सिजनच्या अभावामुळे उद्योगावर परिणाम होत असल्याचे श्री. भामरे यांना सांगितले. यावर श्री. भामरे यांनी शिष्टमंडळाला स्पष्टपणे शासन आदेशाची अंमलबजावणी करून ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना करावा, असे सांगितले. 

उद्योगांना लागणारा ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून तो कोरोना रुग्नांसाठी रुग्णालयांना द्यावा, अशा प्रकारचे शासनाचे पत्र उद्योग संघटनांना प्राप्त झाल्याने व उद्योजकांमध्ये चिंता वाढल्याने आयामांच्या शिष्टमंडळाने या प्रश्नावर जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांची भेट घेऊन संबंधित प्रश्नावर चर्चा केली. शिष्टमंडळात आयामाचे अध्यक्ष वरुण तलवार, सरचिटणीस ललित बूब, सचिव राजेंद्र पानसरे, मनीष रावल, संदीप भदाणे, करण गुप्ता, राजेश गडाख, रवी शामदसानी आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

अनेक उद्योग ऑक्सिजनवर अवलंबून आहेत. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे उद्योगांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन उद्योग बंद पडतील. त्याचा परिणाम रोजगारावरही होईल. त्यासाठी शासनाने समन्वय साधावा. या प्रशनी तोडगा काढावा. 
- वरुण तलवार, अध्यक्ष, आयमा 

सध्या उद्योग ऑक्सिजनऐवजी नायट्रोजनवर चालवावेत. ऑक्सिजनचा कोटा राखीव ठेवण्यात आला आहे. उद्योगांसाठी मिळणार नाही. उद्योजकांनी शासनास सहकार्य करावे. 
- सतीश भामरे, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oxygen quota for patients only nashik marathi news