अखेर ओझरला नगरपरिषदेचा दर्जा! ग्रामपंचायत निवडणूक ठरली औटघटकेची 

दीपक अहिरे
Thursday, 18 February 2021

ओझरची नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणूक औटघटकेची ठरली असून सहा महिने प्रशासकानंतर ओझरच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाचा आखाडा रंगणार आहे. 

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : ओझर शहराला अखेर नगरपरिषदेचा दर्जा देण्यावर शासनाने अंतिम मोहर उमटवली आहे. याबाबतची सर्व प्रशासकीय व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याने राजपत्र व अतिम उद्‌घोषणा येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती माजी आमदार अनिल कदम यांनी दिली. दरम्यान, ओझरची नुकतीच झालेली ग्रामपंचायत निवडणूक औटघटकेची ठरली आहे. सहा महिने प्रशासकानंतर ओझरच्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाचा आखाडा रंगणार आहे. 

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ४ डिसेंबर २०२० रोजी ओझरला नगरपरिषदेचा दर्जा बहला गेला होता. माजी आमदार कदम यांच्या प्रयत्नाने ही प्राथमिक उदघोषणा होऊन अडीच महिने उलटले होते. त्यामुळे नगरपरिषदेच्या दर्जा बाबत सांशकता व्यक्त केली जात होती. या दरम्यान जिल्हा परिषदेचे ठराव, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या पदावर गंडातर येणार असल्याने त्यांची सुनावणी यासह विधी व न्याय विभागाचा अभिप्राय, मंत्रीमंडळात मंजुरी असे द्रविडी प्राणायाम झाले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार यांनी सकारात्मक शेरा दिला. प्राथमिक उद्‌घोषणेवर आलेल्या हरकती निकाली काढण्यात आल्या. अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रस्तावाला अखेर मूर्त रूप आले असून, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे, प्रधान सचिव यांच्या स्वाक्षरीने ओझरला नगरपरिषदेचा दर्जा देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

हेही वाचा - अखेर 'त्या' तरुणीच्या मृ्त्यूचे गूढ उकलले; पोलिसांकडून २४ तासात संशयितांना बेड्या 
रंगणार पक्षीय राजकारण... 

डिसेंबरमध्ये नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्या होत्या. संभाव्य नगरपरिषदेमुळे शिवसेना व राष्ट्रवादीने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे १७ पैकी १० जागा बिनविरोध १६ जागा जिंकत यतिन कदम यांनी ओझर ग्रामपंचायतीवर पुन्हा नागरिकविकास आघाडीचा झेंडा फडकविला होता. माजी आमदार कदम यांच्या भुमिकेचे विविध अर्थ काढले गेले. ओझरच्या भाळी नगरपरिषदेचा कुंमकुम तिलक लावून तो निर्णय योग्य असल्याचे अनिल कदम यांनी अधोरेखित केले. नगरपरिषदेमुळे नुकतेच निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना पदाला मुकावे लागणार आहे. भावी नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. दरम्यान, ओझर ग्रामपंचायत बरखास्त होणार असल्याने पुढील सहा महिने प्रशासकीय कारकीर्द राहणार आहे. त्यानंतर ओझर नगरपरिषदेच्या आखाड्यात माजी आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, यतीन कदम यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आघाडी किंवा भाजपा, राजेंद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व कॉंग्रेस असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पद रद्द होणार आहे. ओझरच्या घर व पाणीपट्टी करात वाढ होईल. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. नगरोत्थान योजनेसह कोट्यवधी रूपयांच्‍या नगरविकास विभागाच्या योजना ओझरमध्ये येऊन विकासाला हातभार लागणार आहे. 

हेही वाचा - इगतपुरीच्या ३०० फूट खोल दरीत तब्बल ११ तासांचा थरार! अखेर रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना यश

प्रशासकीय सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर नगरविकास विभागाने ओझरला नगरपरिषदेचा दर्जा देण्याबाबत अंतिम मोहर उमटविली आहे. ओझरच्या विकासासाठी नगरपरिषदेचा दर्जा मिळवून दिला. नगरपरिषद होणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीत दोन पावले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. आता नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवणार आहे. - अनिल कदम, माजी आमदार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ozar was given municipal status Nashik political Marathi news